देशात कोरोनाचे संकट गडद होत असल्याचे चित्र आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सोमवारी कोविड रुग्णांची संख्या 1009 वर पोहचली. यामध्ये 752 नवीन रुग्णांची भर पडली. तर या नवीन आकडेवारीचा भारतीय शेअर बाजाराने धसका घेतल्याचे समोर आले आहे. सोमवारी Sensex-Nifty दिवसभरात जोरदार उसळला. तर मंगळवारी शेअर बाजाराची सुरूवातच घसरणीने झाली. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा निर्देशांक उघडताच 800 अंकांनी घसरला. सेन्सेक्स 81,500 अंकावर कारभार करत आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी -50 हा कालच्या बंदवरून 200 अंकावरून घसरला. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टीसीएसच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली.
सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण
बीएसईच्या सेन्सेक्स इंडेक्स सोमवारी 82,176.45 च्या तुलनेत 82,038.20 अंकावर उघडला. तर काही मिनिटातच हा निर्देशांक जवळपास 800 अंकांनी घसरला. हा निर्देशांक 81,303 अंकावर व्यापार करत होता. सेन्सेक्सप्रमाणेच एनएसई निफ्टीने पण सुरुवातीच्या सत्रात मोठी घसरण दिसून आली. कालच्या 25,001.15 च्या तुलनेत तो घसरून 24,956.65 अंकावर व्यापार करताना दिसला. पण काही मिनिटातच तो 200 अंकांनी घसरून 24,769 अंकावर व्यापार करताना दिसला.