Friday, June 27, 2025
Homeमहाराष्ट्रसहा लाखांची सुपारी देऊन सख्या भावानेच केला भावाचा गेम; तमदलगे डोंगरावर डोक्यात...

सहा लाखांची सुपारी देऊन सख्या भावानेच केला भावाचा गेम; तमदलगे डोंगरावर डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून

तमदलगे (ता. शिरोळ) येथील डोंगरावर (Tamdalge Dongar) निमशिरगावमधील तरुणाच्या खूनप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी (Jaysingpur Police) बारा तासांतच सहा संशयितांना जेरबंद केले.

 

सहा लाखांची सुपारी देऊन सख्या भावानेच भावाचा गेम केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. मृत अविनाश ऊर्फ दीपक हा दारू पिऊन कुटुंबीयांना त्रास देत असल्याने त्याचा सुपारी देऊन खून केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले.

 

अविनाश ऊर्फ दीपक ओमगोंडा पाटील याचा तमदलगे डोंगरावर डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील (वय ३७, रा. निमशिरगाव), मोहन प्रकाश पाटील (वय ३३, रा. निमशिरगाव), राकेश ऊर्फ विनोद वसंत थोरात (वय २३, रा. कुंभोज रोड दानोळी), किरण आमाण्णा थोरात (वय २७, रा. धनगरवाडा दानोळी), सागर भीमराव लोहार (वय ३०) व अमर रामदास वडर (वय ३३, रा. दिलदार चौक भादोले, ता. हातकणंगले) या सहा जणांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने तीन जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

मंगळवारी सकाळी तमदलगे डोंगरावर फिरायला गेलेल्या नागरिकांना अविनाश ऊर्फ दीपक पाटील याचा मृतदेह दिसला होता. निर्जनस्थळी तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले होते. त्यानंतर जयसिंगपूर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास गतिमान केला. अविनाशचा भाऊ जिनगोंडा पाटील याच्यावर संशय आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर अविनाश हा दररोज दारू पिऊन घरी भांडण करतो. त्याच्या मुलांना, पत्नीला मारहाण करीत असल्याने त्याला कंटाळून मित्र मोहन पाटीलसह राकेश थोरात यांना बोलावून अविनाशने भावाला ठार मारण्याची सुपारी दिली.

 

हा व्यवहार सहा लाख रुपयाला ठरला. ठार मारण्यापूर्वी तीन लाख रुपये व मारल्यानंतर तीन लाख रुपये देण्याचे ठरले. अविनाश हा घरातून किती वाजता बाहेर पडतो व दिवसभर कोठे जातो, यावर पाळत ठेवण्यास संशयितांनी सुरुवात केली होती. सोमवारी (दि. २६) रात्री अविनाशला तमदलगेच्या हद्दीत असलेल्या बसवान खिंडीत डोंगरात निर्जनस्थळी संशयितांनी नेले. त्या ठिकाणी डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केला.

 

पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सत्यवान हाके, सहायक पोलिस निरीक्षक दीपक कदम, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण माने, पोलिस कर्मचारी युनूस इनामदार, सहायक फौजदार विजय गुरखे, नीलेश मांजरे, ताहिर मुल्ला, वैभव सूर्यवंशी, बाळासाहेब गुत्ते यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -