आयपीएल 2025 च्या हंगामाचे जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने पटकावले. गेल्या 18 वर्षांपासून हा संघ विजयाचे स्वप्न पाहात होता. शेवटी हे स्वप्न पूर्ण झाले. दरम्यान, या विजयानंतर भारतभरात विजयोत्सव साजरा करण्यात आला. अजूनही बंगळुरू शहरात हा विजयोत्सव संपलेला नाही. असे असताना बंगळुरू शहरातून मोठी माहिती समोर येत आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या विजयी रॅलीला गालबोट लागले आहे. या रॅलीत चेंगराचेंगरी झाली असून तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
विजयी रॅलीला मोठी गर्दी!
मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरू संघाच्या विजयानंतर बंगळुरू शहरातील एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर या संघाचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते. हे सर्वजण बंगळुरूच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करत होते. मात्र याच वेळी अचानक येथे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले नेमके कोण आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाहीत.
चेंगराचेंगरी नेमकी कशी झाली?
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबवर मोठा विजय मिळवल्यानंतर कर्नाटक क्रिकेट असोशिएशनतर्फे बंगळुरू संघाच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे बडे नेते उपस्थित राहणार होते. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे सर्वच खेळाडू यात सहभागी होणार होते. यामध्ये भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हादेखील येणार होता. या सर्वांचाच या कार्यक्रमात सत्कार होणार होता. ही बाब समजल्यानंतर स्टेडियमच्या बाहरे बंगळुरू संघाच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर गर्दी अनियंत्रित झाली आणि यात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला.
15 ते 20 जण जखमी
धक्कादायक बाब म्हणजे या चेंगराचेंगरीत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजले आहे. तर 15 ते 20 जण यात जखमी झाले आहेत. त्यामुळे आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.