Friday, June 27, 2025
Homeमहाराष्ट्रबहिणीच्या नावाने फेक अकाउंट बनवून मित्राशी चॅटिंग; सत्य कळल्यावर दगडाने ठेचून खून

बहिणीच्या नावाने फेक अकाउंट बनवून मित्राशी चॅटिंग; सत्य कळल्यावर दगडाने ठेचून खून

सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून फसवणूक केल्याच्या संशयातून एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील आंबेगाव परिसरात १५ जून रोजी दुपारी १.३० च्या सुमारास घडली.

 

प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मृत तरुणाचे नाव रोहित नामदेव ढमाले (वय अंदाजे २२ ते २५ वर्षे) असून, त्याचा खून त्याचाच मित्र सूरज सूर्यवंशी याने केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत दीपक सुखदेव बंडगर (वय २३) या तिसऱ्या मित्राने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सूरजला वाटत होते की तो आपल्या मित्र दीपकच्या बहिणीसोबत सोशल मीडियावर चॅट करत आहे. परंतु ते फेक अकाउंट बहिणीच्या नावाने रोहितनेच तयार केलं होतं. ही बाब समजताच सूरज संतापला आणि त्याने रोहितला जाब विचारण्यासाठी भेटायला बोलावलं. त्यावेळी या दोघांमधला वाद विकोपाला गेला आणि सूरजने जवळच पडलेला मोठा दगड उचलून रोहितच्या डोक्यात घाव घातला. यामध्ये रोहितचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर सूरज घटनास्थळावरून फरार झाला आहे.

 

या घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेहाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक कार्यरत असून, लवकरच त्याला अटक केली जाण्याची शक्यता आहे. ही घटना सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणुकीचा आणि फेक अकाउंट्सच्या धोक्याचा गंभीर इशारा देणारी आहे. पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -