जगदीप धनखड यांनी नुकतेच आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीचे कारण देत त्यांनी या पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांना उत्तर आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठी कोणाची निवड होणार? असा सवाल उपस्थित केले जात आहे. आता या पदासाठी थेट नितीश कुमार यांची निवड करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उपराष्ट्रपतीपद बिहारला द्यावं
विशेष म्हणजे नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती करावं, अशी मागणी भाजपाच्याच एका आमदाराने केली आहे. उपराष्ट्रपतीपद बिहारला द्यावं, असं त्यांनी म्हटलंय. अशी मागणी करणाऱ्या भाजपा आमदाराचे नाव हरिभूषण ठाकूर बचौल असे आहे. हरिभूषण यांच्या या मागणीनंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा चालू झाल्या आहेत.
या मागणीचे आता अनेक अर्थ काढले जातायत
बिहारमध्ये या वर्षाच्या शेवटपर्यंत विधानसभेची निवडणूक होणार आहे. असे असतानाच आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती करावं, अशी मागणी तेथील भाजपाच्या आमदाराने केली आहे. या मागणीचे आता अनेक अर्थ काढले जात आहेत. नितीश कुमार यांनी मात्र या मागणीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हरिभूषण ठाकूर बचौल नेमकं काय म्हणाले?
भाजपाचे आमदार हरिभूषण ठाकूर बचौल यांनी नितीश कुमार यांची उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली तर यापेक्षा चांगली बाब कोणती असू शकते. बिहारसाठी ही गौरवास्पद बाब असेल, असं म्हटलंय. याआधी नितीश कुमार यांना देशाचे उपपंतप्रधानपद द्यायला हवे, असे विधान माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांनी केले होते.
मोदी, राष्ट्रपतींचे मानले आभार
दरम्यान, आता उपराष्ट्रपती पदी कोणाची नियुक्ती होणार? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. याआधी सोमवारी (21 जुलै) धनखड यांनी आपला राजीनामा सार्वजनिक केला होता. त्यांनी आरोग्याचे कारण सांगत हा राजीनामा दिला आहे. तसेच राष्ट्रपती तसेच पंतप्रधान यांचेही त्यांनी आभार मानले आहेत. त्यांनी अचानक दिलेल्या या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. आता मात्र या पदावर कोणता नेता विराजमान होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.