कोल्हापूरजवळच्या नांदणी मठातत गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळ राहणारी ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीण हिला नुकतच गुजरातच्या वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात हलवण्यात आलं. मात्र तेव्हापासूनच स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून तिला परत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महादेवीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी काँग्रेस नेत्यांसह अनेकांनी पुढाकार घेतला, स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली, ज्यामध्ये 2 लाखांपेक्षा अधिक लोकांनी सह्या देखील केल्या. तर त्यानंतर वनतारा प्रकल्पाचे सीईओ विहान करणी आणि त्यांच्या टीमने नांदणीला भेटही दिली.
मात्र महादेवी हत्तीणीला परत आणण्याची मागणी सुरूच असून याप्रकरणी आज मुख्यमंत्री फडणवीसही बैठक घेणार आहेत. याचदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री हसन मुश्रीफही मैदानात उतरले असू न महादेवी हत्तण परत येणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ, असंही मुश्रीफांनी म्हटलं आहे.
याप्रकरणावरून जैन समाजाच्याच नव्हे तर सर्वच समाजाच्या भावना या प्रक्षुब्ध झालेल्या आहेत. कालही फार मोठा मोर्चा निघाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं तरी आपण जाऊ, त्याचा संपूर्ण खर्च कार्यकर्ते करतील. मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील याप्रकरणी मंत्रालयात बैठक बोलावली आहे. यातून नक्की मार्ग निघेल. जे प्राणी संरक्षण करणारी संस्था आहे, त्यांच्या मनाप्रमाणे त्या हत्तीणीचं आम्ही निश्चित संरक्षण करू आणि ती महादेवी हत्तीण आम्ही नक्की परत आणूच असा विश्वास मला आहे.
दरम्यान माधुरी हत्तीणीबाबतच आज मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत, जनभावना आणि कायदेशीर बाबी विचारात घेऊन निर्णय होणार , अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.
काय आहे प्रकरण ?
नांदणी मठ हा जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे आणि गेल्या 33 वर्षांपासून महादेवी हत्तीण या मठाचा अविभाज्य भाग होती. ‘पेटा’ या प्राणी हक्क संघटनेने नांदणी मठातील महादेवी हत्तीणीचा वन विभागाच्या परवानगीशिवाय मिरवणुकीसाठी वापर केल्याचा आरोप केला होता. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आणि चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला, प्राण्यांच्या हक्कांना प्राधान्य देण्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने महादेवीला गुजरातमधील वनतारा येथे पाठवण्याचा आदेश दिला. नांदणी मठाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु ती फेटाळण्यात आली. अखेर काही दिवसांपूर्वी महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा येथे पाठवण्यात आलं.