भावा-बहिणीच्या प्रेमळ नात्याचं प्रतीक असलेला, सर्वांचा आवडता असलेला राखी पौर्णिमेचा अर्थात रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. येत्या शनिवारी, 9 ऑगस्टला रक्षाबंधन असून देशभरात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. बहीण आपल्या भावाला प्रेमाने ओलते, त्याचं औक्षण करून, मिठाई भरवून त्याला राखी बांधते आणि भाऊ देखील आजन्म तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. मात्र याच राखीच्या सणापूर्वी एका भावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या विवाहीत बहिणीने टोकाचं पाऊल उचलत अवघ्या 24 व्या वर्षी आयुष्य संपवल्यामुळे तो शोकाकुल झाला आहे. राखीपूर्वीच घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
आंध्रप्रदेशच्या कलावापमुला गालवात ही दुर्दैवी घटना घडली असून तेथे 24 वर्षांच्या विवाहीत महिलेने आत्महत्या केली. त्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. श्रीविद्या असे तिचे नाव असून अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच रामबाबू नावाच्या इसमाशी तिचं लग्न झालं होतं. मात्र सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. लग्नानंतर अवघ्या एका महिन्यानंतर, तिच्या पतीने रामबाबूने श्रीविद्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. दारू पिऊन घरी येणं, तिला मारहाण करणं आणि निर्दयीपणं छळ करणे हे खूप कॉमन झालं होतं.
एका खाजगी महाविद्यालयात लेक्चरर असलेल्या श्रीविद्याने मृत्यूपूर्वी एक नोट लिहीली होती. तिचा पती, रामबाबू याने दुसऱ्या महिलेसमोर तिचा अपमान केला आणि तिला ‘बेकार’ म्हटल्याचं तिने चिठ्ठीत नमूद केलं होतं. एवढंच नव्हे तर तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले, तिचे डोके बेडवर आपटण्यात आले आणि पाठीत ठोसाही मारण्यात आला असा आरोप तिने नोटमध्ये केला होता.
दादा, तुझी काळजी घे, यावर्षी राखी नाही बांधू शकणार
या नोटमध्ये तिने तिच्या भावासाठीदेखील एक मेसेज लिहीला होता. ” दादा, स्वतःची काळजी घे… या वर्षी मी कदाचित तुला राखी बांधू शकणार नाही” असा हृदयद्रावक मेसेज तिने लिहीला. तसेच तिच्या या स्थितीसाठी पती रामबाबू आणि त्यांच्या कुटुंबाला जबाबदार धरत, श्रीविद्या हिने तिच्या चिठ्ठीच्या शेवटी अशी मागणी केली की, त्यांना (सासरचे लोक) कोणत्याही परिस्थितीत सोडू नये.त्यानंतर तिने गळफास लावून घेत आयुष्य संपवलं.
सासरच्या घरात छळ आणि हुंड्यासाठी छळ झाल्यामुळे आत्महत्येची ही पहिलीच घटना नाही, तर अशी अनेक प्रकरणे दररोज समोर येत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये पीडितेने तिच्या मुलासह आत्महत्या केली आहे. काही महिन्यापूर्वीच पुण्याजवळ वैष्णवी हगवणे या विवाहीनेते देखील सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं होतं.