गतविजेत्या टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात यंदा टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेत विजयी सुरुवात करत आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारताने यूएईला त्यांच्याच घरात निच्चांकी धावसंख्येवर गुंडाळत पावरप्लेमध्येच विजय मिळवला. भारताने यूएईला 57 रन्सवर ऑलआऊट केलं. त्यानंतर अभिषेक शर्मा याने केलेल्या 30 धावांच्या जोरावर भारताने 58 हे आव्हान 4.3 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून सहज पूर्ण केलं.
भारताने पहिलाच सामना हा 93 चेंडू आणि 9 विकेट्स राखून जिंकला. आता टीम इंडिया आशिया कप मोहिमेतील आपल्या दुसर्या सामन्यात पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. उभयसंघातील हा सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल होणार असल्याची चर्चा आहे. धक्कादायक बाब म्हणजे यूएई विरुद्ध सर्वाधिक 4 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अर्शदीपसाठी कुलदीपचा पत्ता कट?
साधारणपणे विजयी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला जात नाही. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध कोणत्याही बदलाशिवाय उतरणार का? किंवा अर्शदीप सिंह याला संधी दिली तर त्याच्यासाठी कुलदीप यादव याला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर करण्याचा धाडसी निर्णय घेतला जाणार का? हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
यूएई विरुद्ध भारताच्या तिघांनी विजयात प्रमूख भूमिका बजावली. अभिषेक शर्मा याने बॅटिंगने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर त्याआधी कुलदीप यादव आणि शिवम दुबे या जोडीने धमाका केला. शिवमने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कुलदीप यादव याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. कुलदीपने या 4 पैकी 3 विकेट्स एकाच ओव्हरमध्ये मिळवल्या. कुलदीपने 2.1 ओव्हरमध्ये फक्त 7 रन्स देत यूएईच्या चौघांना बाद केलं. मात्र याच कुलदीपला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्यासाठी पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातून आऊट केलं जाणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
यूएई विरुद्ध हार्दिक पंडया आणि शिवम दुबे या दोघांनी वेगवान गोलंदाजी केली. मात्र हे दोघे प्रमुख गोलंदाज नाहीत. यूएई विरुद्ध टीम इंडिया जसप्रीत बुमराह या एकमेव प्रमुख गोलंदाजासह मैदानात उतरली होती. मात्र यूएई तुलनेत लिंबुटुंब टीम असल्याने भारताला फार अडचण झाली नाही. मात्र पाकिस्तान विरुद्ध भारतासमोर आव्हान असणार आहे. त्यामुळे अर्शदीपला संधी न दिल्यास हार्दिक आणि शिवम पाकिस्तानच्या फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरतील का? हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होतोय. त्यामुळे आता टीम मॅनेजमेंट प्लेइंग ईलेव्हनबाबत नक्की काय निर्णय घेते? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.