ऐतिहासिक वाघनखं येत्या चार दिवसांत गुरुवारपर्यंत नागपूरहून कोल्हापुरात दाखल होणार आहेत. यानंतर दि. 3 मे 2026 पर्यंत आठ महिने या वाघनखांचे कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ, लक्ष्मी विलास पॅलेस येथे आयोजित ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ प्रदर्शन भरवले जाणार आहे.
या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून अन्य शस्त्रे मांडण्यास रविवारपासून सुरुवात झाली आहे. परिसरातील सर्व कामे पूर्णत्वाला आली असून लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून ही वाघनखं तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत. सातारा येथे दि. 20 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत, तर नागपूर येथे दि.1 फेब्रुवारी दि. 30 सप्टेंबरपर्यंत त्याचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यानंतर ही वाघनखं कोल्हापुरात येणार असून त्याचे दि. 3 मेपर्यंत प्रदर्शन राहणार आहे.
‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ प्रदर्शनासाठी 6 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून प्रदर्शन दालनासह विविध कामे करण्यात आली आहेत. पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, उपसंचालक हेमंत दळवी, सहायक अभिरक्षक अमृत पाटील, उदय सुर्वे, वि. ना. निट्टूरकर, बगिचा उपअधीक्षक उत्तम कांबळे, श्रेयस जगताप, शस्त्रतज्ज्ञ गिरीजा दुधाट, वास्तुविशारद अर्चना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.
विशेष सुरक्षा व्यवस्थेत वाघनखं येणार
नागपूरहून वाघनखं आणण्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. या वाघनखांसाठी विशेष वाहनही आहे. या वाहनाच्या पुढे, मागे पोलीस बंदोबस्त असेल. आठ महिने या वाघनखांसाठी 24 तास पोलीस बंदोबस्त राहणार आहे.
हत्तीचा रथ आणि बग्गीचे आकर्षण
लक्ष्मी विलास पॅलेस येथे राजर्षी शाहूंचा हत्तीचा रथ व घोड्यांची बग्गी हुबेहुबे साकारली आहे. त्याद्वारे राजर्षींचा लोकाभिमुख कारभार करणारे कार्यालय कसे होते, हेदेखील नागरिकांना पाहता येणार आहे.
असे पाहता येणार प्रदर्शन
1. ‘सी’ इमारतीतमध्ये प्रवेश- वाघनखं आणि शस्त्रांची पाहणी
2. राजर्षी शाहू जन्मस्थळाची पाहणी
3. जन्मस्थळातील संग्रहालयाची पाहणी
4. हत्तीचा रथ, घोड्यांची बग्गी
5. ‘डी’ इमारतीतील संग्रहालय पाहणी
6. राजर्षी शाहूंवरील माहितीपट, होलिग्राफी शो पाहून बाहेर
प्रदर्शनात 235 शिवकालीन शस्त्रे
प्रदर्शनात शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांच्याकडून राज्य शासनाने संपादित केलेल्या शिवकालीन शस्त्रांपैकी 235 शस्त्रे प्रदर्शनात असतील. त्यात तलवारी, धोप, बुरूज, पट्टा, कट्यारी, ढाल, धनुष्यबाण, खंजीर, कुर्हाडी, बंदुकी आदींचा समावेश आहे.





