गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ऐन नवरात्रोत्सवात नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात कृष्णा पंचगंगा नद्यांचे पाणी आले आहे. मागील २४ तासांत पाणीपातळीत तब्बल १५ फुटांहून अधिक वाढ झाल्याने मंदिर परिसराला पुराचा वेढा पडला आहे.
मुसळधार पाऊस कोसळल्याने नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. रविवारी (दि.२८) दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असली तरी कोयना, वारणा धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे पाणीपातळीत आणखी वाढ होऊ शकते. येथे नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी असते. या काळात शक्यतो पूरस्थिती निर्माण होत नाही. मात्र, सध्या पुराच्या पाण्यातूनच भाविक दत्त दर्शन घेत आहेत. श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून सर्व साहित्य सुरक्षित हलविण्यात येत आहे.
दुर्मिळ योग
गणेशत्सवानंतर नदीचे पाणी पात्रात गेले की पुन्हा पूरस्थिती उद्भवत नाही. त्यामुळे परंपरेनुसार विजयादशमी पासून पालखी सोहळा सुरू होतो. मात्र, धुवाधार अवकाळी पावसामुळे मंदिरात पाणी आले आहे. आणखी तीन ते चार फूट पाणी वाढल्यास रविवारी रात्री उशिरा किंवा सोमवारी पहाटे दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षातील असा प्रथमच दुर्मिळ योग अनुभवण्यास मिळणार आहे.




