Wednesday, November 26, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत मतदार यादीचा गोंधळ शिगेला एका गल्लीतील सर्वच मतदार दुसऱ्या प्रभागात, नागरिक...

इचलकरंजीत मतदार यादीचा गोंधळ शिगेला एका गल्लीतील सर्वच मतदार दुसऱ्या प्रभागात, नागरिक आणि इच्छुकांचा संताप!

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या सदोष असल्याचे समोर येत आहे. मोठ्या प्रमाणात मतदारांच्या प्रभागांची अदलाबदल झाली असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे.

 

एका प्रभागातील एका गल्लीतील सर्वच मतदार दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाल्याने लोकांमध्ये संताप आहे. मतदार याद्यांची फोड करताना पुरेशी खबरदारी घेण्यात आली नसल्याची स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीविरोधात तक्रारी वाढण्याची चिन्हे आहेत.

 

एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात असल्याचे इच्छुकांनी केलेल्या पडताळणीतून समोर येत आहे. याबाबत आज अनेक इच्छुकांनी याबाबत एक गठ्ठा हरकती दाखल करण्यासाठी महापालिकेत धाव घेतली; पण एक गठ्ठा हरकती घेण्‍यास नकार दिल्यानंतर वादावादीचे प्रसंगही तयार झाले.

 

मतदार याद्या फोडताना प्रभागाच्या सीमांची योग्य तपासणी केली नसल्याने काठावरील मतदारांच्या प्रभागांची मोठ्या प्रमाणात अदलाबदल झाल्याचा इच्छुकांचा आरोप आहे. हळूहळू असे प्रकार समोर येत असल्यामुळे इच्छुक धास्तावले आहेत. अनेकांचे आपल्या प्रभागातील हक्काचे मतदार दुसऱ्या प्रभागाच्या यादीत गेल्याचे पाहून इच्छुकांना धक्का बसला आहे.

 

विशेषतः प्रभाग दोनमधील ३०० हून अधिक मतदारांची नावे प्रभाग तीनच्या यादीत आली आहेत. तर प्रभाग ११ मधील १२ मध्ये व पाचमध्ये गेली आहेत. प्रभाग १३ मधील काही मतदार ११ व १३ मध्ये विभागले आहेत. असे प्रकार सर्वच प्रभागांत उघडकीस येत आहेत.

 

याबाबत माजी नगरसेवक राज बोंद्रे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी उपायुक्त नंदू परळकर यांची भेट घेऊन हा प्रकार गंभीर आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी हरकत माझ्याकडे सादर करा, त्याची पडताळणी केल्यानंतर योग्य ती दुरुस्ती केली जाईल, असे स्पष्ट केले.

 

दरम्यान, आज हरकती दाखल करण्यासाठी व त्याबाबतची माहिती घेण्यासाठी दिवसभर नागरिकांची महापालिकेत वर्दळ होती. हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर आहे. या मुदतीत हरकतींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

दिवसभरात ११ वैयक्तिक हरकती

 

महापालिका सभागृहात वैयक्तिक हरकती दाखल करून घेण्याची व्यवस्था केली आहे. दिवसभरात आणखी ११ हरकती दाखल झाल्या. यामध्ये सर्वाधिक प्रभाग आठमधून पाच, तर प्रभाग नऊ आणि १४ मधून प्रत्येकी दोन, तर प्रभाग १५ व १६ मधून प्रत्येकी एक हरकत दाखल झाली. आतापर्यंत ३५ हरकतींची नोंद प्रशासनाकडे झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -