पंचगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. सध्या घाट परिसरातील बराचसा भाग उघड्यावर पडत आहे. आणखी पाण्याची पातळी खालावल्यास शहराला पाणीपुरवठा करणारी पूरक असलेली पंचगंगा योजना बंद पडण्याची भीती आहे.
त्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. मंगळवारी (ता. २५) इचलकरंजी बंधाऱ्यात लोखंडी बरगे घालण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस तरी पाणी उपशावर परिणाम होणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहराला कृष्णा नदीतून बहुतांशी पाणीपुरवठा केला जातो. तर पंचगंगा नदीवरील असलेल्या योजनेतून ९ एमएलडी पाणी उपसा केला जातो. त्यामुळे कृष्णा योजनेली ही पूरक योजना आहे. साहजिकच दोन दिवस आड पाणी देणे शहरवासीयांना शक्य होते.
तथापि, काही दिवसांपासून पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. नदीघाट परिसरातील उंचवटा असलेला भाग सध्या उघडा पडलेला आहे. सध्या घाटालगत असलेल्या इचलकरंजी बंधाऱ्यातून पाणी पुढे प्रवाहित होत आहे. त्यामुळे पंचगंगा योजनेच्या उपसा केंद्राच्या ठिकाणी पाणी पातळी कमी होण्याची भीती आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून इचलकरंजी बंधाऱ्यात पाणी साठविण्यासाठी उद्या (ता. २५) लोखंडी बरगे घालण्यात येणार आहेत. त्यामुळे किमान पाणीसाठी बंधाऱ्यात शिल्लक राहणार आहे.
परिणामी, पंचगंगा नदीचे पात्र कोरडे झाले तरी बंधाऱ्यातील पाणी साठवणुकीमुळे किमान आठ दिवस पाणी उपसा करणे शक्य होणार आहे. मात्र त्यासाठी पाणी प्रदूषणाची तीव्रता वाढणार नाही, याकडेही विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. दुसरीकडे धरणातून पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे धरणांतून सोडलेले पाणी येथील पंचगंगा नदीपात्रात आल्यास मात्र तूर्त दिलासा मिळू शकतो.
पंचगंगा योजनेचे महत्त्व
कृष्णा योजनेतून शहराचा बहुतांशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण जलवाहिनीच्या गळतीचे संकट संपलेले नाही. गळती लागल्यास पाण्याची तूट निर्माण होते. त्यामुळे शहरात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत होते. अशावेळी पंचगंगा योजना मोठी आधार ठरत आली आहे. त्यामुळे कृष्णा योजनेसोबत पंचगंगा योजना कार्यान्वीत ठेवण्यावर पाणीपुरवठा विभाग दक्ष असतो.



