संस्कृत मधील ‘जननी, जन्मभूमीश्यच स्वर्गादपि गरियसी’ हे सुभाषित आईचे मोठेपण सिद्ध करते, आई स्वर्गापेक्षा महान आहे असे सांगते. यामुळे अनेक जण आपल्या आईचा जीवापाड सांभाळ करतात, आईची सेवा करतात.
मात्र, काही पुत्र उलट्या काळजाचे असतात.अशाच एका दिवट्या पुत्राने आपली वयोवृद्ध माता जिवंत असताना पालिकेतून तीचे मृत्यू प्रमाणपत्र मिळविले. नंतर तिच्या बँक खात्यातून तिने मुदत ठेवीच्या रूपात ठेवलेले १० लाख रुपये काढून घेतले. यावर कळस म्हणजे दहा लाखांची रक्कम घेऊन तो फरार झाला. यामुळे वयोवृद्ध माता निराधार झाली असून ‘ मी जिवंत आहे’ हे सिद्ध करण्यासाठी आणि तिला न्याय मिळावा म्हणून पोलीस ठाणे, पालिकेचे आणि कथित नेत्यांचे उंबरठे झिजवीत आहे.
ही करुण कथा अन व्यथा आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील निराधार झालेल्या कौशल्याबाई कमालसिंग राजपूत यांची. प्रेमसिंग राजपूत असे पैशांच्या मोहापायी आईला जिवंतपणी ‘मारून टाकणाऱ्या’ आणि तिचं सर्वस्व हिरावून तिच्यावर भिकेची वेळ आणणाऱ्या मुलाचे नाव प्रेमसिंग राजपूत होय.
जळगाव मधील बहेरील पुरा भागातील ही वयोवृद्ध वर्षीय आता न्यायासाठी एकटीच संघर्ष करीत आहे.तिची करुण कथा ऐकल्यावर दगडालाही पाझर फुटेल अशी तिची भीषण अवस्था झाली आहे. मुलानेच स्वयंघोषित घोषणा पत्रावर जिवंत आईच्या मृत्यूची नोंद बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगरपरिषदेत केली. नगर परिषदेने कुठलीही शहनिशा न करता मुलाला जिवंत मातेचे मृत्यू प्रमाणपत्र देऊन टाकले. यावरच न थांबता या मुलाने आईच्या खात्यात जमा असलेले दहा लाख रुपये हडपले आणि गावातून पळ काढला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून समाज मन सुन्न झाले आहे.






