टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 2025 चा शेवट विजयाने केला. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 5 सामन्यांची टी 20I मालिका 3-1 ने जिंकली. त्यानंतर आता टीम इंडिया मायदेशात नववर्षात न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यूझीलंडचा अनुभवी आणि दिग्गज फलंदाज केन विलियमसन टीम इंडिया विरूद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळणार नाहीय. केनने SA20 स्पर्धेसाठी डरबन सुपर जायंट्ससोबत करार केलाय. त्यामुळे केन वनडे सीरिजमध्ये खेळणार नसल्याची शक्यता अधिक आहे.
SA20 2025-2026 या स्पर्धेचा थरार 26 डिसेंबर ते 25 जानेवारी दरम्यान रंगणार आहे. न्यूझीलंड या दरम्यान भारत दौऱ्यावर असणार आहे. त्यामुळे केन टीम इंडिया विरुद्ध वनडे सीरिजमध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट होतं. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
केन आता फक्त वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्येच खेळतो. तसेच केन आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड यांच्यात कोणताही वार्षिक करार झालेला नाही. त्यामळे केन त्याच्या सोयीनुसार कोणत्या मालिकेत खेळायचं कोणत्या नाही? हे ठरवू शकतो.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 11 ते 31 जानेवारी दरम्यान एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांसाठी आगामी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका फार महत्त्वाची असणार आहे.





