शहराच्या मध्यवस्तीत असणारा प्रभाग क्रमांक सहा यंदाच्या पहिल्या महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय रणांगण ठरणार आहे. राजकीय समीकरणे महायुतीच्या बाजूने झुकलेली असली तरी, उमेदवारीचे गणित मात्र गुंतागुंतीचे झाले आहे.
अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा चार जागांसाठी महायुतीकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे बहुतांश इच्छुक हे अनुभवी, मातब्बर आणि माजी नगरसेवक असल्याने तिकीट वाटप करताना नेतृत्वासमोर मोठा पेच उभा राहिला आहे. कोणाला संधी दिली आणि कोणाला डावलले, यावरून नाराजी वाढण्याची दाट शक्यता असून, बंडखोरी रोखण्यासाठी आतापासूनच सावध पावले टाकावी लागत आहेत.
– ऋषिकेश राऊत
वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या मूलभूत नागरी समस्या, सामाजिक विषमता आणि अंतर्गत राजकारणामुळे हा प्रभाग नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. झोपडपट्टी आणि आलिशान बंगले, सामान्य आणि श्रीमंत अशी टोकाची ओळख असलेल्या या प्रभागात मतदारांचा कौल कोणत्या दिशेने जाणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
पूर्वी या प्रभागावर आवाडे गट आणि कारंडे गटाचे वर्चस्व होते. तत्कालीन नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही गट आमने-सामने उभे ठाकले होते. मात्र, त्याचवेळी भाजपनेही स्वतंत्र ताकदीने निवडणूक लढवत या प्रभागातील राजकारणाला नवे वळण दिले.
आता परिस्थिती पूर्णपणे बदलली असून, आवाडे गट भाजपसोबत आहे, तर कारंडे गटातीलही अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हे सर्व घटक एकत्र येत महायुतीच्या झेंड्याखाली शिव शाहू आघाडीविरोधात लढत आहेत.
दुसरीकडे प्रभागातील नागरी प्रश्न मतदारांच्या रोषाला कारणीभूत ठरणार आहेत. असुरक्षित बनलेला थोरात चौक परिसरातील बाजार, अपुऱ्या सुविधा आणि वाहतूक कोंडीमुळे व्यापारी व नागरिक त्रस्त आहेत.
जयभीम नगर झोपडपट्टीतील तब्बल १०८ लाभार्थ्यांना अद्याप घरे मिळालेली नाहीत. आऊचा मळा भागात सामूहिक घरफाळ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, वैयक्तिक घरफाळ्यासाठी नागरिकांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. शहरातील सर्वात मोठे भवन असणाऱ्या राजीव गांधी भवनची अवस्थादेखील अत्यंत दयनीय असून, त्याच्या दुरवस्थेवरून प्रशासनावर टीका होत आहे.
या पार्श्वभूमीवर शिव शाहू आघाडीनेही प्रभागात जोरदार फिल्डिंग लावली आहे. एक-दोन माजी नगरसेवकांसह डझनभर नवे चेहरे उमेदवारीसाठी इच्छुक असून, महायुतीच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी सुरू आहे.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत या प्रभागात महायुती आणि महाविकास आघाडीचे जवळपास समसमान मताधिक्य दिसून आले होते. मात्र, सध्या संघटनात्मक ताकद आणि एकत्रित नेतृत्वामुळे महायुती भक्कम मानली जात आहे.
मात्र, तिकीट वाटपात नाराजीचा सूर वाढला आणि बंडखोरी झाली तर, महायुतीला विरोधकांपेक्षा स्वकीयांशीच दोन हात करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रभाग सहामधील निवडणूक ही केवळ दोन आघाड्यांमधील नव्हे, तर अंतर्गत राजकीय समतोलाचीही मोठी कसोटी ठरणार आहे.
दृष्टिक्षेपात लोकसंख्या
अनुसूचित जाती लोकसंख्या = १८५३
अनुसूचित जमाती लोकसंख्या = ५१
एकूण लोकसंख्या = १७६०८
पुरुष मतदार = ८७९९
महिला मतदार = ८३४२
एकूण मतदार = १७,१४६
प्रभागाची व्याप्ती
सीईटीपीमागील रोड, काळा ओढा ते शांतिनगर चर्च, कंजारभाट वसाहत, आऊचा मळा, थोरात चौक, वीटभट्टी, मंगलमूर्ती चित्रमंदिर, कापड मार्केट, भगतसिंग उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महापालिका प्रशासकीय इमारत, महावितरण कार्यालय परिसर, जयभीमनगर, वर्धमान चौक डावी बाजू.
विकासाचे मुद्दे
राजीव गांधी भवनाची अवस्था बिकट
थोरात चौक आठवडी बाजारात समस्यांचा डोंगर
जयभीमनगर झोपडपट्टीत उर्वरीत घरांची प्रतीक्षा
आऊचा मळ्यातील सामूहिक घरफाळा प्रश्न
ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची वानवा
आरक्षण असे
अ – अनुसूचित जाती
ब – ओबीसी महिला
क – खुला महिला
ड – खुला





