Friday, January 30, 2026
Homeकोल्हापूरनिगवे खालसा येथे गाभण गायीची हत्या; भानामतीचा संशय

निगवे खालसा येथे गाभण गायीची हत्या; भानामतीचा संशय

करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथे अंधश्रद्धेचा एक अतिशय संतापजनक आणि क्रूर प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात व्यक्तींनी एका शेतकर्‍याच्या बंद शेडमध्ये घुसून गाभण गायीची हत्या केली

 

विशेष म्हणजे, गायीच्या मृतदेहाशेजारी करणी-भानामतीचे साहित्य आढळल्याने संपूर्ण गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

या घटनेत शेतकरी महादेव गोपाळा पाटील यांचे सुमारे एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुतार गल्लीत राहणारे शेतकरी महादेव पाटील यांनी आपल्या घरासमोरच गायींसाठी पत्र्याचे शेड बांधले आहे. नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता गायींना वैरण घालण्यासाठी ते शेडमध्ये गेले असता त्यांना आपली गाभण गाय मृतावस्थेत आढळली.

 

दोन महिन्यांत दुसरी घटना

 

धक्कादायक बाब म्हणजे, महादेव पाटील यांची दुसरी गाय अशाच प्रकारे दोन महिन्यांपूर्वी मारली गेली होती. केवळ पाटील यांच्याच बाबतीत नाही, तर गेल्यावर्षी गावातील स्मशान शेड, मराठी शाळेचे मैदान आणि लोहार गल्लीतील एका घरासमोरही अशाच प्रकारे काळी बाहुली, लिंबू आणि सुया वापरून भीती पसरवण्याचे प्रकार घडले होते. शेजारील वडकशिवाले परिसरातही अशा घटनांची नोंद झाली आहे.

 

या घटनेनंतर माजी उपसरपंच संभाजी किल्लेदार, सदस्य संतोष किल्लेदार, सुजाता सुतार, नामदेव मांडवकर यांच्यासह ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावेळी जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन पथक आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तत्काळ अटक करावी, सरकारने संबंधित गरीब शेतकर्‍याला आर्थिक मदत द्यावी, गावातील अशा अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशा मागण्या करण्यात आल्या.

 

करणी करण्यासाठीचे साहित्य

 

गायीच्या तोंडाजवळ भाकरीचा तुकडा पडलेला होता, ज्यातून विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी करणीचे साहित्य आढळले. मृत गायीच्या शेजारीच पत्रावळीवर गुलाल लावलेला भात, सुया खुपसलेले पाच लिंबू व बिबा आणि हळद-कुंकू असे साहित्य मांडून ठेवलेले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -