Imagesऑस्ट्रेलियात 10 डिसेंबरपासून लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध लावण्यात आले आहेत. मोबाईल फोन आणि सोशल मीडिया आता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनले आहेत.
पण माहितीची देवाणघेवाण आणि जवळच्या लोकांसोबत संपर्क या उपयोगांपलीकडे या माध्यमांमुळे होणारं नुकसान हा चिंतेचा विषय बनला आहे. म्हणूनच अनेक देशांत लहान मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याची चर्चा होते आहे.
10 डिसेंबर 2025 रोजी ऑस्ट्रेलिया हा 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा पहिला देश ठरला.
या अंतर्गत मुलांची इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, टिकटॉक आणि एक्स यांसारख्या प्लॅटफॉर्मवरील खाती बंद करण्यात आली आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या मते यामुळे मुलांना धोक्यांपासून वाचवता येईल.
पण टीकाकारांच्या मते यामुळे मुले अनियंत्रित प्लॅटफॉर्म्सचा वापर सुरू करण्याचा धोका वाढू शकतो. अनेक इतर देशांचे नेते या निर्णयावर लक्ष ठेवून आहेत.
मग ऑस्ट्रेलियानं सोशल मीडियावर लावलेले निर्बंध जगभरात लागू होऊ शकतात का?
एक पिढीचे ‘डीअॅक्टिव्हेशन’
कोविडच्या जागतिक साथीच्या काळात लहान आणि किशोरवयीन मुलांचा ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला.
मुलं आता गरजेपेक्षा जास्त वेळ ऑनलाइन घालवत आहेत आणि त्याचा मुलांच्या मानसिक विकासावर वाईट परिणाम होत असल्याची चिंता अनेकांना वाटते. जगभरात या विषयावर गंभीर चर्चा होते आहे.
AFP via Getty Images10 डिसेंबर 2025 रोजी 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी जाहीर करताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज
सोशल मीडियावर हानिकारक गोष्टी सहजपणे मुलांपर्यंत पोहोचत आहेत आणि अनेक ठिकाणी किशोरवयीन मुलांच्या आत्महत्येचा सोशल मीडिया वापराशी संबंध जोडला गेला आहे.
त्यामुळेच सरकारांवर कडक कायदे करण्यासाठी दबाव वाढतो आहे, असं टेरी फ्लिव्ह सांगतात. ते ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठात डिजिटल कम्युनिकेशन आणि कल्चर विषयाचे प्राध्यापक आहेत.
“जगभरात तरुणांमध्ये नैराश्य वाढत आहे आणि सोशल मीडियाचे व्यसन हे यामागचं एक कारण असल्याचं अनेक अभ्यासांमधून समोर आलं आहे. किमान या दोन्ही गोष्टींमध्ये संबंध आहे, हे तरी स्पष्ट होतंय. शैक्षणिक जगातही या मुद्द्यावर वादविवाद सुरू आहेत.”
अनेक सोशल मीडिया वेबसाईटवर खाते उघडण्यासाठी व्यक्तीचे वय 13 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. पण हा नियम काटेकोरपणे लागू केला जात नसल्याचं दिसून येतं.
दुसरीकडे मुलं आणि किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी आपण सतत काम करत असल्याचा दावा फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मची मालकी असलेल्या मेटा कंपनीनं केला आहे.
पण अशा दाव्यांवर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही, असं टेरी फ्लिव्ह सांगतात.
“या कंपन्या स्वतःला नियंत्रित करू शकतील असं त्यांना वाटत नाही. फेसबुकने जवळपास 20 वर्षांपूर्वी असे नियम बनवले होते, पण त्यांची गंभीरपणे अंमलबजावणी झाली असती, तर आज हा कायदा करण्याची वेळ आली नसती.”
BBCसोशल मीडियावर बंदी लागू करताना अँथनी अल्बानीज यांनी त्यामागची भूमिका स्पष्ट केली.
ऑस्ट्रेलियन सरकारने गेल्या वर्षअखेर सोशल मीडिया नियंत्रणासंबंधी कायद्याची घोषणा केली होती, त्याची अंमलबजावणी 10 डिसेंबर 2025 पासून झाली.
या कायद्यानुसार 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वेबसाईटवर नवी खाती उघडू देऊ शकणार नाहीत. तसंच 16 वर्षांखालील मुलांची सध्या सक्रीय खाती त्यांना निष्क्रिय करावी लागतील.
कंपन्यांनी या कायद्याचं पालन करण्यासाठी योग्य पावले उचलली नाहीत, तर त्यांच्यावर 33 दशलक्ष डॉलर्सचा दंड लावला जाऊ शकतो. पण योग्य पावले म्हणजे काय, हे मात्र स्पष्ट केलेलं नाही.
तसंच या बंदीमुळे मुलं इतर अनियंत्रित प्लॅटफॉर्मचा, डार्क वेबचा वापर करू लागतील, याविषयी ऑस्ट्रेलियामध्ये चिंता व्यक्त केली जाते आहे.
टेरी फ्लिव्ह यांनाही तीच भीती वाटते. ते सांगतात की, नोंदणीकृत सोशल मीडिया कंपन्या कायद्याचे पालन करण्याचं आश्वासन देत आहेत, पण हे एका रात्रीत होणार नाही.
“किशोरवयीन मुलांना धूम्रपानावरील बंदीची योग्य अंमलबजावणी करता आलेली नाही, तसंच याही बाबतीत होऊ शकतं. पण या कायद्याचा आणखी एक उद्देश आहे. तो म्हणजे मुलांना याचे वाईट परिणाम समजावून सांगण्यासाठी सक्षम करणं.”
“खरं तर सोशल मीडियाबद्दल असंतोष वाढतोय. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियन तरुणांमध्ये सोशल मीडियाचा वापर कमी होतोय आणि हा ट्रेंड पुढेही सुरू राहू शकतो.”
लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे आता तरुण टेक्स्ट-आधारित प्लॅटफॉर्मऐवजी व्हीडिओ प्लॅटफॉर्मकडे वळतायत जिथे उत्तेजक प्रतिक्रियांवर जास्त भर असतो.
डिजिटल विकास
मी कॉलेजात होते, तेव्हा आम्ही ईमेल किंवा चॅटरूमचा वापर केला होता. पुढे मायस्पेस, ऑर्कुट आणि मिक्सईटसारख्या सोशल मीडिया वेबसाईट्स लोकप्रिय झाल्या.
बहुतेक जण तेव्हा मित्रमैत्रिणींशी गप्पा मारण्यासाठी किंवा गाणी वगैरे शेअर करण्यासाठी म्हणजे सुरक्षित मनोरंजनासाठी या प्लॅटफॉर्म्सचा वापर करायचे.
AFP via Getty Imagesसोशल मीडिया बॅन लागू झाल्यावर ऑस्ट्रेलियातल्या मुलांच्या मोबाईलवर असे काही मेसेजेस आले आहेत.
त्यानंतरच्या 20 वर्षांत मात्र या प्लॅटफॉर्म्सचं स्वरूप बरंच बदललं आणि त्याची सुरुवात 2006 मध्ये फेसबुक आलं, तेव्हापासून झाली.
अगदी लवकरच फेसबुक जगभरातल्या ऑनलाईन अक्टिव्हिटीचं मुख्य साधन बनलं.
त्यानंतर ट्विटर आलं, जे आता एक्स म्हणून ओळखलं जातं.
मग 2010 मध्ये फोटोंवर आधारित इंस्टाग्राम आणि 2011 मध्ये स्नॅपचॅट बाजारात आले.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मीडिया आणि कम्युनिकेशन विभागातल्या प्राध्यापक सोनिया लिव्हिंगस्टन या बदलांविषयी माहिती देताना सांगतात, “पूर्वीच्या तुलनेत आज सोशल मीडियाचा आवाका बराच वाढला आहे आणि वापराची पातळी अमर्यादित झाली आहे.”
“मुलं अशा लोकांच्या आणि गोष्टींच्या संपर्कात येत आहेत, ज्याची पूर्वी कल्पनाही करता येत नसे. त्यामुळे सोशल मीडियापासून मुलांना असलेला धोका खूप वाढला आहे.”
हे एक दुधारी शस्त्र आहे.
एकीकडे संयुक्त राष्ट्रांनी 2016 मध्ये इंटरनेटची उपलब्धता हा मानवाधिकार असल्याची घोषणा केली आणि जगभरातील लोकांना इंटरनेट उपलब्ध करून देणे याला आपल्या विकासाच्या उद्दिष्टांचा भाग बनवलं.
पण सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळे अनेक धोके निर्माण झाले असल्याचंही संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे.
त्यांच्या एका अहवालात म्हटलं आहे की, 30 देशांतील एक तृतीयांश मुलांनी सोशल मीडियावर बुलिंग किंवा मानसिक छळाचा सामना करावा लागल्याचं सांगितलं. त्यातल्या प्रत्येक 5 मुलांपैकी एकाने शाळेत जाणे बंद केले.
त्यामुळे सरकारांनी डिजिटल धोरणे तयार करताना मुलांवर होणाऱ्या परिणामांचा विचार करायला हवा, असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे.






