Friday, January 30, 2026
Homeमहाराष्ट्रFacebook Live वर मृत्यूचा थरार! बायको फॉलोअर्सशी बोलत होती अन् सर्वांसमोर झाला...

Facebook Live वर मृत्यूचा थरार! बायको फॉलोअर्सशी बोलत होती अन् सर्वांसमोर झाला नवऱ्याचा मृत्यू

पोटाची खळगी भरण्यासाठी आणि मुलाबाळांचे भविष्य घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून ऊस तोडणीसाठी गेलेल्या एका तरुण मजुराचा दुर्दैवी अंत झाला आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी (सोन्नाखोटा) येथील गणेश डोंगरे यांचा लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्यावर भीषण अपघातात मृत्यू झाला.

 

हा अपघात इतका भयानक होता की, पत्नी अश्विनी ही सोशल मीडियावर लाईव्ह असतानाच तिच्या डोळ्यादेखत गणेशचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि ऊसतोड मजुरांमध्ये शोककळा पसरली आहे.

 

नेमकं काय घडलं?

 

गणेश डोंगरे यांना केवळ 1 एकर जमीन होती. घरात वृद्ध आणि भोळसर आई-वडील, पत्नी आणि तीन चिमुकल्या मुली असा मोठा परिवार होता. गावाकडे पत्राच्या शेडमध्ये राहणाऱ्या या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. घराचा गाडा हाकण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी गणेश आणि त्यांची पत्नी अश्विनी यांनी ऊस तोडणीचा मार्ग स्वीकारला.

 

मागील काही वर्षांपासून हे जोडपे राज्यातील वेगवेगळ्या भागात जाऊन ऊस तोडणीचं काम करत होतं. यावर्षी ते लातूर जिल्ह्यातील एका कारखान्यावर कामाला गेले होते, मात्र तिथे त्यांच्या आयुष्याचा प्रवास असा संपेल याची कोणालाही कल्पना नव्हती.

 

लाईव्ह रिल सुरू असतानाच कोसळलं आभाळ

 

गणेश आणि अश्विनी हे दांपत्य सोशल मीडियावर रिलस्टार म्हणून ओळखले जायचे. कष्ट करत असतानाही ते आनंदाने आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असत. शनिवारी दुपारी ऊसाने भरलेले ट्रॅक्टर कारखान्यावर वजन करण्यासाठी रांगेत उभे होते. यावेळी अश्विनी सोशल मीडियावर लाईव्ह होती.

 

अश्विनी तिच्या फॉलोअर्सशी संवाद साधत असतानाच, जवळून जाणाऱ्या एका ट्रॅक्टरची ट्राली अचानक गणेश यांच्या अंगावर कोसळली. हा अपघात इतका वेगवान होता की गणेश यांचा जागीच मृत्यू झाला. हसतं-खेळतं कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झालं आणि अश्विनीच्या डोळ्यासमोर तिचा आधार हरपला.

 

कारखान्याचा निष्काळजीपणा जीवघेणा !

 

हा अपघात ज्या साखर कारखान्यावर झाला, तिथल्या ढिसाळ नियोजनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कारखान्याच्या परिसरात जिथे वाहने उभी राहतात, तिथे रस्ते व्यवस्थित नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच, ऊसाचे वजन (माप) वेळेवर होत नसल्यामुळे गणेश यांना तिथे ताटकळत उभे राहावे लागले होते.

 

प्रशासनाने योग्य व्यवस्था केली असती, तर कदाचित हा अपघात टाळता आला असता, अशी भावना व्यक्त होत आहे. या अपघातात गणेश यांच्यासोबत असलेला आणखी एक मजूरही जखमी झाला आहे.

 

25 लाख रुपयांच्या मदतीची मागणी

 

गणेश डोंगरे यांच्या निधनामुळे त्यांच्या तीन लहान मुली आणि वृद्ध आई-वडिलांवर अनाथ होण्याची वेळ आली आहे. कुटुंबाचा एकमेव कमावता आधार गेल्यामुळे आता त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित साखर कारखान्याने या अपघाताची जबाबदारी स्वीकारावी आणि पीडित कुटुंबाला किमान 25 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही शासनाने किंवा कारखान्याने उचलण्याची विनंती ग्रामस्थांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -