येथील पंचगंगा साखर कारखाना मार्गावर असलेल्या जलाराम ट्रेडर्स या दुकानात झालेल्या चोरीचा छडा शिवाजीनगर पोलिसांनी लावला. या चोरीप्रकरणी अट्टल गुन्हेगार मुकेश गणपती जाधव (वय ३९) व उमेश गणपती गोसावी ऊर्फ जाधव (४३, सध्या रा. शाहूनगर, चंदूर) या दोघांना अटक केली.
या कारवाईत त्यांच्याकडून ५ लाख १४ हजार २८६ रुपये किमतीचे विविध कंपनीचे पितळी नळ व दीड लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी जप्त केली.
किशोर पटेल यांच्या दुकानाच्या गोडावूनचा पत्रा उचकटून चोरट्यांनी सुमारे ६ लाख ३६ हजार २०० रुपये पितळी नळ चोरून नेले होते. ही घटना दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी उघड झाली. गुन्ह्याच्या तपासात धर्मराज चौक येथे एका मोटारीतून संशयित जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.
अधिक चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता ३ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.




