Sunday, February 22, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील मुलांसोबत चेन्नईत मोठी दुर्घटना! 10-15 फूट उंच लाट आली अन् मुलं...

महाराष्ट्रातील मुलांसोबत चेन्नईत मोठी दुर्घटना! 10-15 फूट उंच लाट आली अन् मुलं वाहून गेली, काळीज पिळवटून टाकणारी घटना

तामिळनाडूची राजधानी चेन्नईमधील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तरुणांच्या ग्रुपसोबत मोठी दुर्घटना घडली आहे.चेन्नईतील प्रसिद्ध गोल्डन बीचवर फेरफटका मारण्यासाठी गेलेले 26 तरुण-तरुणी समुद्राच्या अजस्त्र लाटांच्या तडाख्यात सापडले. या दुर्घटनेत भंडारा जिल्ह्यातील मयुरी चौधरी या तरुणीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर जळगावचा जय पाटील हा तरुण अद्याप बेपत्ता आहे. सुदैवाने, राज केदारी या तरुणाला वाचवण्यात यश आले आहे.

 

 

नेमकी कशी घडली घटना?

 

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील हे 26 तरुण चेन्नईतील एका या नामांकित आयटी कंपनीत इंटर्नशिप करत होते. शनिवारी सुट्टी असल्याने हा ग्रुप पुद्दुचेरी रोडवरील कांथाट्टूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनारी फिरायला गेला होता. सकाळी फिरायचा आनंद घेत असताना काही जण सेल्फी आणि फोटो काढण्यात मग्न होते. मात्र, त्याच वेळी समुद्रात अचानक 10 ते 15 फूट उंचीच्या अक्राळविक्राळ लाटा उसळल्या. या लाटांचा वेग इतका प्रचंड होता की, काठावर उभे असलेले तीन तरुण पाण्यात खेचले गेले.

 

 

15 दिवसांपूर्वीच लागली होती नोकरी

 

मृत पावलेली मयुरी चौधरी ही भंडारा जिल्ह्यातील वरठी गावची रहिवासी होती. अवघ्या 15 दिवसांपूर्वीच ती चेन्नईत नोकरीला लागली होती. करिअरची नुकतीच सुरुवात झालेली असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

मयुरीच्या निधनाची बातमी तिच्या एका मैत्रिणीने घरी दिली. सध्या तिचे कुटुंबीय नागपूरहून चेन्नईकडे रवाना झाले आहेत. दुसरीकडे, बेपत्ता जय पाटील याचे नातेवाईकही चेन्नईत पोहोचले असून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मदतीचे आवाहन

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून एक्स पोस्ट करत माहिती देण्यात आली. चेन्नई (तामिळनाडू) येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत पाण्यात उतरताना दुर्घटना घडली असून या घटनेत महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला असून ते मदत व बचाव कार्यावर सतत देखरेख ठेवून आहेत.

 

तामिळनाडू शासनाकडून प्राप्त माहितीनुसार, 26 विद्यार्थ्यांपैकी केवळ 3 विद्यार्थी पाण्यात उतरले होते. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील मयुरी चौधरी यांना दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला, तर जय पाटील यांचा शोध अद्याप लागलेला नाही आणि त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. राज केदारी हे सुरक्षितपणे बाहेर आले आहेत.

 

जय पाटील यांचे नातेवाईक चेन्नई येथे पोहोचले असून मयुरी चौधरी यांचे नातेवाईक नागपूरहून चेन्नईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुःखद घटनेबद्दल मयुरी चौधरी यांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त करत संवेदना व्यक्त केल्या आहेत.

 

तसेच, तामिळनाडू सरकारने शोध व बचाव कार्य अधिक गतीने राबवून सर्वतोपरी मदत करावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य प्रशासन संबंधित कुटुंबीयांच्या सतत संपर्कात असून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -