नाशिकमधील नाशिक-गिरणारे मार्गावरील हॉटेल गंमत जंमतजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात २४ वर्षीय तरुण ठार, तर दोघे जखमी झाले. अपघातात ठार झालेला तरुण दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेहून परतला होता.
हा अपघात शनिवारी (ता. ४) रात्री घडला. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. शंतनू जयंत बुहऱ्हाडे (वय २४, रा. दीपज्योती, धनराजनगर, जेल रोड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. Youth Dies in Nashik Accident
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंतनू बुऱ्हऱ्हाडे उच्च शिक्षणानिमित्त अमेरिकेत होता. दोन दिवसांपूर्वीच नाशिक रोड येथील घरी परतला होता. दरम्यान, शनिवारी (ता. ४) दुपारी चारच्या सुमारास तो त्याच्या दोन मित्रांसह कार (एमएच ४६, झेड ००६७) ने गंगापूर बॅकवॉटर आणि धरण परिसर फिरण्यासाठी गेला होता. रात्री साडेआठच्या सुमारास गिरणारेकडून नाशिककडे परतत असताना गोदावरी नदीवरील पुलाजवळ असलेल्या गंमत जंमत हॉटेलजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार पलट्या घेऊन रस्त्यालगत असलेल्या झाडावर जाऊन आदळली. अपघात भीषण असल्याने कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
कारमधील शंतनूच्या डोक्यासह शरीराला गंभीर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. त्याचे दोन मित्रही गंभीररीत्या जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच, तालुका पोलिस आणि स्थानिकांनी बचावकार्य केले. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
शंतनू एकुलता
इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये कार्यरत जयंत बुहऱ्हाडे यांचा शंतनू हा एकुलता मुलगा होता. उच्च शिक्षणानिमित्ताने तो अमेरिकेला गेला होता. दोन दिवसांपूर्वीच तो नाशिकला परतला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्याच्यावर काळ ओढावला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



