शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत पुण्यातील बिबवेवाडी येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या शाळेला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
शाळेतील ६९ जागांसाठी २ हजार ९४ अर्ज दाखल झाले.राज्य शैक्षणिक संशोधन आणि परिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते आरटीई प्रवेशाची सोडत काढण्यात आली.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, सहसंचालक रमाकांत काठमोरे, एनआयसीच्या आदिती एकबोटे, एससीईआरटीच्या सह संचालक डॉ. कमलादेवी आवटे, पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनंदा वाखारे या वेळी उपस्थित होत्या. पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
गोसावी म्हणाले, ८ हजार ७०१ शाळांमध्ये १ लाख १४ हजार ८२६ जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी २ लाख ८९ हजार ६०९ अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी आरटीईअंतर्गत सर्वाधिक ८८ हजारांहून अधिक प्रवेश झाले होते. सोडतीनंतर आता दोन दिवसांत प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी, प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश सुरू केले जातील.
सिंह म्हणाले, शिक्षण हा विकासाचे सर्वांत उपयुक्त माध्यम आहे. प्रत्येक खासगी शाळेला २५ टक्के राखीव जागा वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे बंधन आहे. केवळ उच्च वर्गाच्या शाळा निर्माण होऊ नये, समावेशकता असावी हा कायद्याचा उद्देश्य आहे. गेल्या काही वर्षांत आरटीईमार्फत लाखो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्याशिवाय जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका शाळाही गुणवत्तापूर्ण आहेत.
गैरप्रकार आढळल्यास कारवाई
गेल्या काही वर्षांत काही गैरप्रकार लक्षात आले आहेत, त्यावर उपाययोजना करण्यात आली. खोटी माहिती दिलेल्या पालकांवर कारवाई करण्यात आली. प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवणारे एजंट निर्माण झाले आहेत. मात्र, अशा कोणावरही पालकांनी विश्वास ठेवू नये. या प्रवेश प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप नाही, संपूर्णपणे ऑनलाइन चालणारी प्रक्रिया आहे. गैरप्रकार आढळल्यास तक्रार करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल, असे सिंह यांनी सांगितले.



