आयपीएल 2026 स्पर्धेतील प्रत्येक सामन्यानंतर आचारसंहितेची तपासणी करून त्याचं आकलन केलं जातं. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यानंतरही त्याची तपासणी करण्यात आली. या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी हार्दिक पांड्याला जबाबदार धरलं गेलं आहे. तर आरसीबीच्या टिम डेविडने पंचांना त्रास दिल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात टीम डेविडने स्तर 1 चं उल्लंघन केल्याचं दिसून आलं आहे. टिम डेविडने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.4 चे उल्लंघन केल्याचे आढळले. या कलमानुसार, सामन्यादरम्यान पंचांच्या निर्देशांचे पालन न करण्याशी संबंधित आहे. त्यामुळे त्याच्या सामना शुल्काच्या 25 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे. तसेच त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट देखील जमा झाला आहे.
आरसीबीचा डाव सुरू असताना 18 व्या षटकात हा प्रकार घडला. हार्दिक पांड्या हे षटक टाकत होता आणि पहिल्याच चेंडूवर टिम डेविडने चौकार मारला. त्यानंतरचा चेंडू हार्दिक नो टाकला. त्यामुळे हा चेंडू परत टाकण्याची वेळ आली, तसेच फ्री हिट मिळाल्याने टिम डेविडने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने या चेंडूवर षटकार मारला. पण जेव्हा हा चेंडू मैदानात आला तेव्हा त्याचा खूपच ओला असल्याचं दिसून आलं. तसेच त्याचा आकारही थोडा बदलला होता. त्यामुळे पंचांनी हा चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. चेंडूंचा बॉक्स मैदानावर आला, तेव्हा टिम डेविडने त्यातील एक चेंडू उचलला आणि त्याच्याशी खेळू लागला. तसेच हवेत उडवून पाहिला. यावेळा त्याने ही कृती वारंवार केली. पंच वारंवार चेंडू मागत होते, पण तो परत करण्याऐवजी डेव्हिड आपली गंमत करत राहिला. डेव्हिडच्या या कृतीने पंच थोडे चिडलेले दिसले.
टिम डेविड वारंवार चेंडू वर उडवून पाहात होता. तेव्हा पंचांनी चेंडू मागितला, पण त्याने हा चेंडू काही लगेच दिला नाही. त्यानंतर 20 षटकातील दुसर्या चेंडूवर जितेश शर्माची विकेट पडल्यानंतर पुन्हा चेंडू हातात घेतला. पंचांनी पुन्हा मागितला पण तो त्याने दिला नाही. पंचांच्या सूचना किंवा निर्देशांचे पालन न करणं त्याने वारंवार टाळलं. त्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून सामनाधिकाऱ्यांनी दिलेली शिक्षा मान्य केली आहे.



