‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला संपूर्ण स्टारकास्टसह संगीतकार अजय-अतुल सुद्धा उपस्थित होते. रितेश देशमुख गेल्या अनेक वर्षांपासून या सिनेमासाठी मेहनत घेत होता. अखेर हा सिनेमा येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या सगळ्याच कलाकारांनी ट्रेलर लॉन्च सोहळ्यात रितेशचं भरभरून कौतुक केलं.
‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ट्रेलर लॉन्च झाल्यावर विद्या बालन, संजय दत्त, अभिषेक बच्चन अशा उपस्थित सगळ्याच कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर, संगीतकार अजय गोगावले सुद्धा यावेळी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. अजय-अतुल अगदी पहिल्या दिवसापासून ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा महत्त्वपूर्ण भाग होते. या दोघांनी १० वर्षांपासून कधीच साथ सोडली नाही असं रितेश देशमुखने सर्वांना सांगितलं.
अजय गोगावले सांगतात, “नमस्कार! जय शिवराय! या प्रसंगी मला तुम्हा सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे…आम्ही या सिनेमाची सुरुवात कशी केली, केव्हा केली… या सगळ्या गोष्टी सांगायला आता मला खरंच खूप वेळ लागेल. पण, आता ट्रेलर पाहून एक गोष्ट जरुर सांगेन…आता मी हिंदी-मराठी असे दोन्ही ट्रेलर पाहिले, तेव्हापासून जे डोळ्यातले अश्रू सुरू झालेत… ते अजूनही थांबलेले नाहीयेत. भाऊ यापूर्वी माझं असं कधीच झालं नव्हतं. मन भरून आलंय खरंच…कारण, अनेक वर्षांपासून मला पडद्यावर हेच पाहायचं होतं.”
“या सिनेमात एकापेक्षा एक दिग्गज कलाकार आहेत. पण, आम्ही सिनेमा पाहताना समोर आमचे राजे पाहतो, राजमाता जिजाऊ पाहतो, शहाजीराजे पाहतो…आपण जेव्हा माँ जिजाऊ म्हणतो…तेव्हा ही प्रत्येक भावना आमच्यासाठी फार खोल आहे. त्यामुळेच या चित्रपटातील प्रत्येक क्षण माझ्या हृदयात आहे. “शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।” हे आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल…या सिनेमाच्या संगीत निर्मितीत हातभार लावून आम्हाला आपल्या महाराजांना ती मानवंदना देता आली. अशाप्रकारे कला सादर करण्यासाठी आमच्या देवाने आम्हाला संगीतकार केलं…अन्यथा आमच्याकडेच काहीच नाहीये. फक्त या देवतेबद्दलची भक्ती आहे.”
“मी शिवराय पाहिले नाहीत…पण, अशी माणसं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला महाराजांची शौर्यगाथा ऐकायला मिळाली, पाहायला मिळतेय या सगळ्यांचे आज मी मनापासून आभार मानतो. ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून कौतुक करतो. आज ट्रेलर पाहून खरंच खूप छान वाटलं. रितेश भाऊ खरंच या सिनेमासाठी तुमचे खूप खूप आभार! अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही या सिनेमाशी जोडले गेलो होतो ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचेही आभार मानतो. जय शिवराय!” अशा भावना यावेळी अजय गोगावले यांनी व्यक्त केल्या.





