अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर’ या प्रतिष्ठित कार्यक्रमदारम्यान अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असताना घडलेल्या या प्रकारानंतर सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत लोकशाहीत हिंसाचाराला कोणतेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले.
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित एका खास कार्यक्रमादरम्यान गोळीबाराची घटना घडली. हा कार्यक्रम हिल्टन हॉटेल येथे पार पडत होता, जिथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असताना ट्रम्प उपस्थितांना संबोधित करत होते. त्याच वेळी अचानक स्फोटासारखा आवाज झाला आणि गोळीबार सुरू झाला. या घटनेमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी टेबलखाली आश्रय घेतला.
घटनेनंतर सिक्रेट सर्विस आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने कारवाई करत ट्रम्प यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. सुरक्षारक्षकांनी त्यांच्या भोवती मानवी कवच तयार करत त्यांना सुरक्षित बाहेर काढले. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोराला अडवण्याचा प्रयत्न होत असताना त्याने गोळीबार सुरू केला. या घटनेनंतर सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “लोकशाही व्यवस्थेत हिंसाचाराला स्थान नाही. अशा घटनांचा कठोर निषेध झाला पाहिजे.” त्यांच्या या विधानामुळे भारताने या घटनेकडे गंभीरतेने पाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गोळीबारानंतर ट्रम्प यांनी सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगितले. तसेच, सिक्रेट सर्विस आणि संबंधित यंत्रणांमुळेच मोठा अनर्थ टळल्याचे त्यांनी नमूद करत त्यांचे आभार मानले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून जगभरातून या प्रकाराचा निषेध व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे.

