संपूर्ण देशाचे लक्ष सध्या पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. उद्या म्हणजेच 4 मे रोजी या सर्व राज्यांमधील निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. तसेच राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा निवडणुकीचाही निकाल उद्या जाहीर होणार आहे. बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राहुरीतून अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित मानला जात आहे. उद्याच्या निकालाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आसाममध्ये भाजपची हॅटट्रिक की काँग्रेसचे पुनरागमन? उद्या निकाल
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची जादू आसाममध्ये पुन्हा चालणार, की गौरव गोगोई सत्ता मिळवणार याचा निकाल उद्या समोर येणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला तिसऱ्यांदा सत्त मिळेल की काँग्रेस सत्ता मिळवण्यात यशस्वी होईल? हे सोमवारी समोर येणार आहे. 126 विधानसभा जागा असलेल्या आसाममध्ये बहुमतासाठी 64 जागांची आवश्यकता आहे. हा जादुई आकडा कोण गाठते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तामिळनाडूमध्ये डीएमके की टीव्हीके?
तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) च्या नेतृत्वाखालील सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स (एसपीए) सत्ता कायम राखण्याच्या तयारीत दिसत आहे. चाणक्य, मॅट्रिक्स, पी-मार्क, प्रजा पोल, पीपल्स डायरी आणि पोल डायरी यांनी तामिळनाडूमध्ये डीएमकेला सत्ता मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर पुदुचेरीमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजपला येथे 16 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे.
केरळ- बंगालमध्ये काय स्थिती?
केरळमधील डाव्या आघाडी एलडीएफचे 10 वर्षांचे राज्य आता संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. सर्वेक्षणांनुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणात केरळमध्ये भाजपच्या लोकप्रियतेत लक्षणीय घट होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपा सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा टीएमसीला हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
बारामती आणि राहुरीकडेही लक्ष
दुसरीकडे राज्यातील जनतेचे लक्ष हे राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीच्या पोटनिवडणुकीकडेही असणार आहे. अजित पवार आणि शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुक पार पडली. बारामतीत सुनेत्रा पवार आणि राहुरीत अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित मानला जात आहे.



