रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 47 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर 4 मे रोजी 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. निकोलस पूरन याने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर लखनौने मुंबईसमोर 229 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 8 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. मुंबईने 18.4 ओव्हरमध्ये 229 धावा केल्या. मुंबईने अशाप्रकारे आयपीएल इतिहासातील आपल्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. मुंबईचा हा या मोसमातील वानखेडे स्टेडियममधील दुसरा तर एकूण तिसरा विजय ठरला. तर लखनौ पुन्हा एकदा अपयशी ठरली.
मुंबईची चाबूक सुरुवात
मुंबईने विजयी धावांचा पाठलाग करताना ज्या पद्धतीने सुरुवात केली ते पाहून पलटणच जिंकणार, असा विश्वास चाहत्यांना होता. रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा (इमपॅक्ट प्लेअर) या सलामी जोडीने चाबूक सुरुवात केली. दोघांनी पावरप्लेमध्ये 71 धावा जोडल्या. दोघांनी दोन्ही बाजूंनी फटकेबाजी सुरुच ठेवली. रोहित रायनने चौफेर फटकेबाजी करुन मुंबईच्या विजयाचा पाया मजबूत केला. सलामी जोडीला फार मोठी भागीदारी करण्याची संधी होती. मात्र मोहसिन खान याने ही जोडी फोडली.
रायननंतर रोहितही आऊट
मोहसिनने 11 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर रायनला आऊट केलं. रायनने 32 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 6 फोरसह 83 रन्स केल्या. रोहित आणि रायनने 65 बॉलमध्ये केलेली 143 रन्सची पार्टनरशीप मोडीत निघाली. रायननंतर काही अंतराने रोहित आऊट झाला. रोहितने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. रोहितने 44 चेंडूत 7 सिक्स आणि 6 फोरसह 84 धावा केल्या.
तिलक-सूर्या अपयशी
तिलक वर्मा आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव या दोघांनी काही खास करता आलं नाही. तिलतने 11 आणि सूर्याने 12 धावा केल्या. त्यानंतर नमन धीर आणि विल जॅक्स या दोघांनी उर्वरित धावा पूर्ण केल्या आणि मुंबईला विजयी केलं. नमनने नाबाद 23 धावा केल्या. तर विलने नॉट आऊट 10 रन्सचं योगदान दिलं. लखनौसाठी मनीमरण सिंह याने 2 विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद शमी आणि मोहसिन खान या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
पहिल्या डावात काय झालं?
त्याआधी मुंबईने टॉस जिंकला. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं. लखनौने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 228 धावांपर्यंत मजल मारली. लखनौसाठी निकोलस पूरन याने सर्वाधिक 63 धावा केल्या. मिचेल मार्श याने 44 धावा जोडल्या. हिंमत सिंग याने नाबाद 40 तर एडन मार्करम याने नॉट आऊट 31 रन्स केल्या
अक्षत रघुवंशी याने 11, जोश इंग्लिसने 13 आणि कॅप्टन ऋषभ पंत याने 15 धावा जोडल्या. तर मुंबईसाठी कॉर्बिन बॉश याने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स मिळवल्या. तसेच अल्लाह गजनफर, विल जॅक्स आणि रघु शर्मा या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.




