कोल्हापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी खुनाच्या घटना घडल्या. किरकोळ वादाचा राग मनात धरून फरशी व लोखंडी गजाने मारहाण करून सख्ख्या लहान भावाचा खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री मलकापूर येथे घडली, तर कोनोली तर्फ असंडोली पैकी फाल्याचा धनगरवाडा (ता.राधानगरी) येथे धारदार हत्याराने तरुणाचा खून करण्यात आला.
कोनोली तर्फ असंडोली पैकी फाल्याचा धनगरवाडा (ता. राधानगरी) येथे धारदार हत्याराने तरुणाचा खून करण्यात आला. सूरज पांडुरंग फाले (वय ३५, सध्या रा, राजारामपुरी, कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. यामध्ये सोनिया तानाजी पाटील ही (३०) गंभीर जखमी झाली.
काल सायंकाळी सात वाजता ही घटना घडली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेतील तीन संशयित स्वतःहून राधानगरी पोलिसांत हजर झाले. रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, फालेवाडा येथील सूरज हा आज दुपारी तीनच्या सुमारास पत्नीसह कोल्हापूरहून येथे आला होता. त्याचवेळी सध्या कोल्हापूर येथे राहणारे धोंडिराम बापू फाले, दगडू बापू फाले, बाबू ज्ञानू फाले येथे आपल्या मूळ घरी आले होते.
त्यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. सूरजच्या मानेवर खोलवर वार केल्याने रक्ताचे थारोळे साचले होते, तर डोक्यात वर्मी घाव बसल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी हा वाद सोडविण्यासाठी गेली असता तिच्याही डोक्यात मार बसल्याने तीदेखील गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावरती कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यातील संशयित धोंडिराम फाले, दगडू फाले, बाबू फाले हे राधानगरी पोलिसांत हजर झाले. घटनास्थळी एका चारचाकी वाहनाची तोडफोड केली होती. या गाडीमध्ये एक बंदूक तसेच दारूच्या बाटल्या पोलिसांना आढळून आल्या. अधिक तपास राधानगरीचे पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करत आहेत.
शाहूवाडी मलकापुरात सख्ख्या भावाने केला खून
किरकोळ वादाचा राग मनात धरून फरशी व लोखंडी गजाने मारहाण करून सख्ख्या लहान भावाचा खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री मलकापूर येथे घडली. नरेंद्र इतवारी सिदर (वय ३५, रा. मेमरा महासमुंडा, ता. भोकलुडी, रा. छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर पसार झालेल्या मोठा भाऊ धीरेंद्र सिदार याला स्थानिक पोलिस व गुन्हे अन्वेषण कोल्हापूरच्या पथकाने काही तासांत अटक केली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, मलकापूर येथील नगरपालिकेच्या मागे एका इमारतीच्या बांधकामावर मजुरीने काम करण्यासाठी नरेंद्र सिदार व त्याचा मोठा भाऊ धीरेंद्र हे आले होते. त्यांच्यात वारंवार वाद होत होता. शुक्रवारी रात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी धीरेंद्र याने नरेंद्रला फरशी, प्लास्टिक पाईप व लोखंडी गजाने मारहाण केली. डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. यानंतर धीरेंद्र याने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, आज सकाळी प्लबिंग कामगार कामावर गेले असता हा प्रकार निदर्शनास आला. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. शाहूवाडी पोलिसांत माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, फौजदार परशुराम शिरसाट, मानसिंग खताळ, हनमंत कुंभार यांच्यासह पोलिस पथक हजर झाले. पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार कोल्हापूरहून स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक संतोष गवळे, अनिल जाधव, पोलिस हिंदूराव केसरे, वसंत पिंगळे, विनोद कांबळे यांचे पथकही हजर झाले.
फरारी धीरेंद्र याच परिसरात लपून बसला असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी आसपासचा परिसर पिंजून काढला. मलकापूर-येळाणे दरम्यानच्या शाळी नदीकाठावरील झुडपांमध्ये तो लपून बसल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. रागाच्या भरात आपण आपल्या छोट्या सख्ख्या भावाचा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे.
ठेकेदाराला केला फोन आणि…
भावाचा खून केल्यानंतर आरोपी धीरेंद्र पसार झाला होता. मात्र, त्याने काही वेळानंतर दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरून आपला ठेकेदार मालक बिलाल याला फोन केला. छत्तीसगडला गेलेल्या बिलालशी पोलिसांनी संपर्क केल्यानंतर त्याने धीरेंद्रचा मला थोड्या वेळापूर्वी फोन आला होता, असे सांगून तो मोबाइल नंबर दिला. त्यावरून फरार आरोपी मलकापूर परिसरातच असल्याचे सिद्ध झाले आणि तो सापडला.




