कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका येथील हिरण्यकेशी नदीवरील हिरलगे-कोवाड बंधाऱ्यावर रविवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत मामा व भाच्याचा बुडून मृत्यू झाला.
पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये सुनील विष्णू सुतार (वय ५०, रा. कोवाड) आणि त्यांचे भाचे प्रवीण पांडुरंग सुतार (वय ३६, रा. वाळकी, ता. चिकोडी) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण पांडुरंग सुतार हे आपल्या सासरवाडी हिरलगे येथे सासऱ्यांच्या निवृत्ती कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमानिमित्त नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने जमली होती. सोमवार (दि. ११ मे) दुपारी कार्यक्रमातील जेवण आटोपल्यानंतर प्रवीण यांनी आपले मामा सुनील सुतार यांना कोवाड येथे सोडण्यासाठी दुचाकीवरून हिरलगे बंधाऱ्यालगत आले.
दुचाकी नदीकाठावर उभी करून दोघेही बंधाऱ्यालगत पाण्यातून पायी कोवाडकडे निघाले. मात्र, बंधाऱ्यावरील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास दोघेही पाण्यात बुडाले. त्यावेळी आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांना तातडीने मदत मिळू शकली नाही. परिणामी दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
मृत सुनील विष्णू सुतार यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. तर प्रवीण पांडुरंग सुतार यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची नोंद घेऊन पोलीस हवालदार साजिद सिकलदार यांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. हिरण्यकेशी नदीवरील संबंधित बंधारा अर्धवट आणि असुव्यवस्थित अवस्थेत असल्याने स्थानिकांकडून सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.




