नोव्हेंबर २०२३ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी रोडवर झालेल्या भीषण बस अपघातात पत्नी आणि दोन मुलांना गमावलेल्या पुण्यातील विराट गौतम यांनी बुधवारी (१४ मे २०२६) त्याच अपघातस्थळी देहत्याग केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
२०२३ चा तो काळा दिवस
२३ नोव्हेंबर २०२३ रोजी गोव्याहून मुंबईकडे निघालेली खासगी आराम बस (एमएच १२ टीव्ही १६५८) रात्री २ च्या सुमारास पिरवाडी (पुईखडी) जवळील वळणावर उलटली. या अपघातात पुणे येथील मांजरी बुद्रुक परिसरातील रहिवासी विराट विठ्ठललाल गौतम यांच्या पत्नी नीलू विराट गौतम (४८), मुलगी रिद्धिमा (१७) आणि मुलगा सार्थक (१३) यांचा जागीच मृत्यू झाला. विराट गौतम हे जखमी अवस्थेत बचावले होते. बस चालकाला वेग आणि वळणाचा अंदाज न आल्याने त्याने अचानक ब्रेक लावला आणि बस रस्त्यावर उलटली. या अपघातात एकूण नऊ प्रवासी जखमी झाले होते. करवीर पोलिस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुःखाने खचलेले विराट
अपघातानंतर विराट गौतम यांनी एकट्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नी आणि दोन्ही मुलांच्या आठवणींनी त्यांना सतत त्रास दिला. त्यांच्या फेसबुक पोस्टमधून त्यांच्या मनातील वेदना स्पष्ट दिसून येत होती. “आज कोल्हापुरात देहत्याग केला आहे”, “आतापर्यंत कसे जगत आलो हेच कळत नाही”, “काही माणसे आयुष्यात अशी असतात की त्यांच्याशिवाय जगणे अशक्य वाटते”, “माझे जग त्याच क्षणी संपले” अशा भावनिक ओळी त्यांनी लिहिल्या होत्या. या पोस्टमधून त्यांच्या एकटेपणाची आणि असह्य दुःखाची झलक दिसून येत होती.
अपघातस्थळीच जीवन संपवले
विराट गौतम यांनी ज्या ठिकाणी त्यांचे संपूर्ण कुटुंब कायमचे हरपले होते, त्याच ठिकाणी जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. स्थानिकांना बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
ती घटना धक्कादायक
२०२३ साली झालेल्या भीषण बस अपघातात विराट गौतम यांनी पत्नी आणि दोन्ही मुलांना आपल्या डोळ्यांसमोर गमावले होते. हा धक्का त्यांच्यासाठी अत्यंत असह्य ठरला होता. अपघातावेळी त्यांचा मुलगा बसच्या चाकाखाली अडकला होता. त्याला बाहेर काढून वाचवण्याचा विराट यांनी प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. ही घटना त्यांच्या मनावर खोल जखम करून गेली होती. २०२४ आणि २०२५ या दोन्ही वर्षांत विराट गौतम अपघातस्थळी येऊन कुटुंबीयांना श्रद्धांजली वाहत होते. यंदा मात्र ते चार दिवस आधीच कोल्हापुरात आले होते. त्यांनी घटनास्थळी जाऊन कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, या आठवणींचा मानसिक धक्का सहन न झाल्याने त्यांनी विष प्राशन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.




