Saturday, May 30, 2026
Homeमहाराष्ट्र1 जूनपासून मासेमारी बंद, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मच्छिमारांवर कारवाईचा बडगा

1 जूनपासून मासेमारी बंद, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मच्छिमारांवर कारवाईचा बडगा

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील मच्छीमारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. समुद्रातील मासळीच्या साठ्याचे जतन करण्यासाठी आणि पावसाळ्यातील वादळी हवामानापासून मच्छीमारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी शासनाने यंदा १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत पावसाळी मासेमारीवर अधिकृत बंदी जाहीर केली आहे. ठाणे-पालघर जिल्ह्याचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त (तांत्रिक) दिनेश पाटील यांनी या संदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत समुद्रातील माशांचा प्रजोत्पादन काळ असतो, त्यामुळे या बंदीमुळे मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेला मोठा वाव मिळून समुद्रातील मासळीचा साठा वाढण्यास मदत होते.

 

मत्स्यव्यवसाय विभागाने दिलेल्या आदेशानुसार, ही पावसाळी मासेमारी बंदी सर्व प्रकारच्या यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांना पूर्णपणे लागू राहील. मात्र, पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचलित नौकांना या बंदीतून सवलत देण्यात आली आहे. सध्या समुद्रात गेलेल्या सर्व यांत्रिक नौकांनी ३१ मे २०२६ पूर्वीच आपापल्या बंदरांमध्ये परतणे बंधनकारक करण्यात आले असून, १ जून किंवा त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरांवर मासे उतरवण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच, राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंतच्या क्षेत्राबाहेर खोल समुद्रात जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाचे धोरण व मार्गदर्शक सूचना लागू राहतील.

 

या शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन सर्व मच्छीमार सहकारी संस्थांना करण्यात आले आहे. जर बंदीच्या काळात कोणतीही यांत्रिक नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करताना आढळली, तर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांतर्गत ती नौका, त्यावरील उपसाधने आणि पकडलेली मासळी जप्त करून संबंधित मालकावर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. इतकेच नव्हे तर, बंदीच्या काळात समुद्रात जाऊन अपघात झाल्यास अशा नौकेला शासनाकडून कोणतीही आर्थिक नुकसान भरपाई मिळणार नाही, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व नौकामालकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आता एक जूनपासून मासेमारी करणाऱ्या यांत्रिक बोटींना समुद्रात जाण्यास मज्जाव असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -