मुंबईत एका नामांकित शाळेच्या बसवर भले मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. चेंबूरमधील रोड नंबर ११ वर ही मंगळवारी (३० जून) दुपारी ही घटना घडली. झाड कोसळल्याने बसमधील १२ विद्यार्थी जखमी झाले असून, एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.
विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची माहिती माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका खासगी शाळेची ही बस आहे. शाळेची बस विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. त्याचवेळी मोठे झाड शाळेच्या बसवर कोसळले. यात शाळेची बस पूर्णपणे चेपली गेली. यात १२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
एका विद्यार्थिनीचा मृत्यू
शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची माहिती माहिती महापालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर तातडीने जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने विद्यार्थ्यांना बाहेर काढले. त्यांना परिसरातील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, झाड कोसळल्यामुळे बस चेपली गेली आहे. यात एक विद्यार्थी बसमध्येच अडकला होता. त्याला बऱ्याच वेळानंतर बाहेर काढण्यात आले. या घटनेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. राहुल शेवाळे म्हणाले की, शाळेच्या बसमध्ये १३ ते १५ विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली. सर्वांना बाहेर काढण्यात आले असून, एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.
बसवर पडलेले झाड हटवण्यासाठी क्रेनही आणण्यात आले असून, सध्या वेगाने काम सुरू आहे.
महापौर रितू तावडे म्हणाल्या…
“चेंबूरमधील रोड ११ वर दुर्दैवी घटना घडली आहे. ही बस मुलांना शाळेत घेऊन जात होती, त्यावेळी डायमंड गार्डनजवळ असलेल्या हेरिटेज इमारतीजवळच हे झाड बसवर कोसळले. बसमध्ये १३ विद्यार्थी होते. १२ विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आहे”, अशी माहिती मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिली.




