Homeकोल्हापूरमुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

घरात बोलावून गर्भलिंग निदान करून देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. भोगावती कारखाना परिसरात मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह गर्भलिंग निदानासाठी लागणारे साहित्य घटनास्थळावरून जप्त करण्यात आले.

 

कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आल्याने परिसरातही याची कोणाला माहिती नव्हती. याप्रकरणी एजंटासह चार ते पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः भोगावती परिसरात गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती आरोग्य विभाग व स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. आज सायंकाळी सापळा रचून एक डमी महिला गर्भलिंग निदान करण्यासाठी पाठवली. पोर्टेबल मशीनच्या मदतीने तिचे गर्भलिंग निदान केले जात असताना पथकाने छापा टाकला. त्यावेळी गर्भलिंग निदानाचे काम करणारा म्होरक्या, दोन एजंटांसह चार ते पाच जण सापडले. पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले.

 

पूर्वीच्या कारवाईतील संशयितच म्होरक्या

 

भुदरगड तालुक्यात यापूर्वीही झालेल्या कारवाईतील संशयितच पुन्हा हा गुन्ह्यात अडकला आहे. मडिलगे खुर्द येथे २०२३ मध्ये झालेल्या कारवाईत त्याचा सहभाग समोर आला होता. यानंतर पुन्हा तोच या गर्भलिंग निदान रॅकेटचा म्होरक्या असल्याचे समोर आले.

 

३० हजार रुपयांचा दर

 

गर्भलिंग निदान चाचणीसाठी २५ ते ३० हजार रुपये घेतले जात होते. मंगळवारीही पाठविलेल्या महिलेकडे अशाच रकमेची मागणी केली होती. त्यांनी संशयितांच्या मागणीला होकार देत गर्भलिंग निदानासाठी बोलाविलेले ठिकाण गाठले. येथे गर्भलिंग निदान सुरू असतानाच छापा टाकण्यात आला.

 

महिलांच्या जीवाशी खेळ

 

संशयितांमध्ये वैद्यकीय क्षेत्राशी निगडित कोणीही नाही. एजंट, मुख्य संशयित हे केवळ गिऱ्हाईक गोळा करण्याचे काम व गर्भलिंग निदान करतात. येथे कोणीही डॉक्टर नसताना हा महिलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर आरोग्य विभाग व पोलिस आता कोणती कारवाई करणार हे पाहावे लागेल.

 

मोका लागणार का ?

 

जिल्ह्यातून गर्भलिंग निदानाचे समूळ उच्चाटन होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही अशा प्रकरणात मोका कारवाईचे निर्देश दिले होते. २०२३ मधील संशयित पुन्हा या कारवाईत मिळून आल्याने त्याच्यावर आता मोका कारवाई होणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -