Homeमहाराष्ट्रसाखरेच्या वाढत्या दरावर राजू शेट्टींचा सवाल; 'साखरेच्या दरवाढीत २० ते २२ हजार...

साखरेच्या वाढत्या दरावर राजू शेट्टींचा सवाल; ‘साखरेच्या दरवाढीत २० ते २२ हजार कोटींचा काळाबाजार?’

साखरेच्या दरात अचानक झालेली वाढ संशयास्पद आहे. देशभरात साखरेच्या काळ्या बाजारात २० ते २२ हजार कोटी रुपयांचा व्यवहार होत असल्याचा संशय असून, साखरेचा वाढलेला दर पाहता प्रत्येक साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना टनाला किमान ५०० रुपये दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

 

पुढील हंगामात पुरेसे उत्पादन होणार

 

यंदाचे पीक आणि पाण्याची उपलब्धता पाहता पुढील हंगामात देशाला पुरेल एवढे साखरेचे उत्पादन होणार आहे. त्यामुळे साखरेची आयात करण्याचा निर्णय घेतला तरी ऑक्टोबरपूर्वी परदेशातून साखर येणे शक्य नाही. सध्या उपलब्ध साठा पाहता दिवाळीनंतरही देशाला पुरेल एवढी साखर शिल्लक राहणार आहे. त्यामुळे दरातील अचानक वाढ संशयास्पद असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

 

कारखान्यांकडून साठा संपल्याचा कांगावा

 

साखरेचे दर वाढताच काही साखर कारखानदारांनी साखर आधीच विकून टाकली असून, आता फारसा साठा शिल्लक नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी कमी दरात साखर खरेदी करून ती कारखान्यांच्या गोदामातच ठेवली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढलेल्या दराचा फायदा व्यापाऱ्यांना मिळण्याची शक्यता असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

 

‘रिकव्हरी’तील गैरप्रकाराची चौकशी करा

 

‘रिकव्हरी चोरून रेकॉर्डवर नसलेली साखर तयार केली जात असेल आणि वाढलेल्या दराचा फायदा अशा साखरेला होत असेल, तर हा गंभीर प्रकार आहे. या माध्यमातून कारखानदार आणि व्यापाऱ्यांच्या खिशात पैसा जाण्याची शक्यता आहे. सरकारने याची चौकशी करावी,’ अशी मागणी शेट्टी यांनी केली.

 

साखरेचे सध्याचे दर पाहता प्रत्येक साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टनाला ५०० रुपये दुसरा हप्ता द्यायला हवा. आधीची साखर कमी दरात विकली असली तरी उर्वरित साखरेला मिळणारा वाढीव दर आणि संपूर्ण हंगामातील विक्रीचा विचार करता ४०० ते ५०० रुपये दुसरा हप्ता देणे कारखान्यांना शक्य आहे, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

 

कारखान्यांच्या साठ्याची अचानक तपासणी करा

 

सरकारने प्रत्येक साखर कारखान्याकडे प्रत्यक्षात किती साखर शिल्लक आहे, याची तातडीने माहिती घ्यावी. कारखान्यांनी दाखविलेला साठा आणि प्रत्यक्ष साठा याची पडताळणी करण्यासाठी अचानक धाडी टाकाव्यात, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

 

साखरेची वाहतूक करणाऱ्या ट्रकचीही तपासणी करावी. त्यांच्याकडे वैध पावत्या आहेत का, जीएसटी भरला आहे का आणि बिनपावतीची साखर बाजारात आणली जात आहे का, याची चौकशी करावी. देशभरात २० ते २२ हजार कोटी रुपयांचा साखरेचा काळाबाजार होत असल्याचा संशय असल्याने सरकारने तातडीने या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करावी, असे शेट्टी यांनी म्हटले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -