रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांचा प्रवास सुरक्षित करण्याच्या उद्देशाने इचलकरंजी शहर वाहतूक शाखेतर्फे महाधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात नियमित विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ऑगस्ट महिन्यात मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या ३५ जणांवर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि विकास शिदे यांनी दिली.
भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रस्ते अपघात घडतात. उपलब्ध आकडेवारीनुसार २०२१ ते २०२३ या तीन वर्षांच्या कालावधीत मद्य अथवा अंमली पदार्थाचे प्राशन करन वाहन चालविल्यामुळे २८ हजार ३७३ रस्ते अपघात झाले. या अपघातांमध्ये ११ हजार १८९ जणांचा मृत्यू झाला असून २४ हजार ७३९ जण जखमी झाले आहेत. इचलकरंजी शहर वाहतूक शाखेतर्फे अशा निष्काळजी वाहनचालकांच्या विरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत २४१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी ऑगस्ट महिन्यात ३५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईतील वाहने जप्त करण्यात आली आहेत.
मद्यधुंद वाहनचालकांविरोधात यापुढेही शहरात नियमित विशेष तपासणी मोहिमा राबवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून जबाबदारीने वाहन चालवावे आणि सुरक्षित इचलकरंजीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन सपोनि शिंदे यांनी केले आहे.
