दर महिन्याच्या पहिल्या तारखेला आर्थिक स्वरुपात बरेच बदल घडतात.सप्टेंबर महिना बरेच बदल घेऊन आला आहे. दुधाच्या दरात वाढ, रिक्षाच्या भाड्यात वाढ झाली असतानाच, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ झाली. अशा परिस्थितीत, सप्टेंबरपासून आणखी एक बदल झाला आहे, जो सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा झटला लावून जाणारा आहे.
जर तुम्हीही एटीएम वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एटीएम वापरणाऱ्यांसाठी बँकेने पैसे काढण्यासंबंधीचे नियम कडक केले आहेत. आतापर्यंत व्यवहार हे मोफत स्वरुपाचे होते. कितीही वेळा पैसे काढता येत होते. पण आता या व्यवहारांवर बंधन घालण्यात आली आहेत. मोफत व्यवहारांची संख्या कमी करण्यात आली आहे. जाणून घेऊया कोणत्या बँकेने किती लिमीट सेट केली आहे आणि त्याचा काय परिणाम होईल?
कोणत्या बँकेने बदल केला?
कॅनरा बँकेने १ सप्टेंबर २०२६ पासून, बँकेचे एटीएम किंवा कॅश रिसायकलर्स वापरणाऱ्या बचत खातेधारकांसाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. बऱ्याच नियमांमध्ये सुधारणा केली आहे. जर तुम्ही नियमित ग्राहक असाल, तर तुम्हाला आता तुमच्या यापुढे एटीएममधून फक्त पाच वेळा मोफत पैसे काढता येतील. पण ज्येष्ठ नागरिकांसाठी यामधून सूट देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी मोफत व्यवहारांची मर्यादा पूर्वीसारखीच ठेवण्यात आली आहे जी दरमहा आठ इतकी कायम आहे.
मोठ्या व्यवहारांसाठी वेगळं शुल्क
महत्त्वाची गोष्टी म्हणजे एखाद्या ग्राहकाने महिन्यातून पाच वेळा पैसे काढले आणि त्यानंतर सहाव्यांदा एटीएममधून पैसे काढायचे असतील तर त्यांना आता एक्स्टा चार्जेस भरावी लागतील. हे चार्जेस ₹23 रुपये इतके आहेत. त्यामुळे अधिक जीएसटी भरून यापुढे व्यवहार करावा लागेल. पूर्वी हे शुल्क ₹20 अधिक जीएसटी होते. याचा अर्थ बँकेने रोख रक्कम काढण्याच्या शुल्कातही वाढ केली आहे.
अकाऊंट बॅलंस चेक करण्यासाठी
खात्यातील शिल्लक म्हणजे अकाऊंट बॅलंस चेक करण्यासारख्या गैर-आर्थिक व्यवहारांसाठीच्या शुल्कात कोणताही बदल झालेला नाही. मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर, अशा व्यवहारांसाठी ₹5 अधिक जीएसटी शुल्क आकारले जाईल.
किमान शिल्लकेसंबंधीच्या नियमांमध्येही बदल
कॅनरा बँकेने ग्राहकाच्या खात्यात पुरेशी रक्कम नसताना होणाऱ्या व्यवहारांसाठीचे शुल्कही वाढवले आहे. पूर्वी अशा व्यवहारांसाठी ₹17 अधिक जीएसटी शुल्क होते, जे आता वाढवून ₹23 अधिक जीएसटी करण्यात आले आहे. मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतरही हे शुल्क लागू होईल.
