इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या सीसीटीव्ही प्रणालीचे कॅमेरे दगडाने फोडणे येथील गुंडांच्या टोळीला चांगले महागात पडले. हा धक्कादायक प्रकार (शनिवार) उघडकीस आला. याप्रकरणी पोलिस रेकॉर्डवरील गुंड ज्ञानेश्वर भिमराव पवार, चेतन पांडुरंग पवार, ओंकार राजेंद्र गुरव, अजिज दस्तगीर मुल्ला, ऋतुराज भरत मुसळे (सर्व रा. इस्लामपूर) यांना गुन्हे प्रगटीकरणच्या पथकाने अटक केली. सरकारी मालमत्तेचे नुकसान, जमावबंदी आदेशाचा भंग, दहशत माजवणे या कलमाअंतर्गत त्यांचावर गुन्हा दाखल झाला आहे. ज्ञानेश्वर, चेतन, ओंकार, अजिज यांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. ऋतुराज याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, इस्लामपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी आलमगीर लतीफ हे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही सर्व्हेलियन्सचे काम पाहतात. त्यासाठी पोलिस ठाण्यामध्ये वेगळा कक्ष करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी ते सीसीटीव्ही कंट्रोल रुममध्ये आले होते. त्यावेळी सरनोबत वाडा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेबंद व काही कॅमेऱ्यांची दिशा बदलल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर लतिफ यांनी तेथे जावून पाहिले असता, तेथील कॅमेऱ्यांची मोडतोड झाल्याचे त्यांना दिसले.