डोबिंवली शहराची ओळख सांस्कृतिक शहर अशी आहे. सोमवारची सकाळ मात्र संपूर्ण शहराला अस्वस्थ करणारी ठरली. टिळक चौकात विजया बाविस्कर या महिलेचा घरातच खून झाल्याचे उघडकीस आले होते. शांत आणि इतरांना मदत करण्याचा स्वभाव यामुळे बाविस्कर यांचा खून होणं हे सहाजासहजी कुणाला पटत नव्हते.
बाविस्कर यांच्या घरी काम करणारी बाई सोमवारी सकाळी त्यांच्या घरी आली. बाविस्कर कुठे तरी बाहेर गेल्या असतील असे समजून तिने दरवाजा ढकलला. दरवाजाला बाहेरून कडी होती. कडी उघडून तिने घरात प्रवेश करताच तिला जे काही दिसले ते काळजात धस्स करणारे होते. बाविस्कर या मृताअवस्थेत पडलेल्या होत्या. घाबरलेली बाई तशीच बाहेर आली, घडला प्रकार तिने शेजाऱ्यांना सांगितला आणि लगेचच पोलिसांनाही कल्पना दिली.
पोलिसही तातडीने घटनास्थळी आले. बाविस्कर यांचा गळा आवळून खून झाला होता, हे पोलिसांच्या लक्षात आले. बाविस्कर या घटस्फोटित होत्या. ३० वर्षांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला होता, आणि त्या वडिलांकडे राहत होत्या. सहजासहजी कुणावर संशय घ्यावा अशी काही स्थिती नव्हती. बाविस्कर यांची प्रॉपर्टीही चांगली असल्याने प्रॉपर्टीचा काही वाद आहे, अशी शंका पोलिसांना आली होती.
पोलिसांनी तपासासाठी ५ पथके नेमली. यादरम्यान बाविस्कर यांच्याकडे रविवारी रात्री एक महिला आली होती, असे पोलिसांना समजले. लगेचच या महिलेबद्दल तपास सुरू केला.
रविवारी संध्याकाळी सीमा आणि बाविस्कर यांची भेट झाली होती. चांगल्या गप्पाही झाल्या होत्या. आज माझ्या घरी कुणी नाही, तर मी तुझ्या घरी मुक्कामाला येऊ का, असा सवाल सीमाने केला होता. बाविस्कर यांनीही होकार दिला.