पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या शिवजन्मस्थळ शिवनेरी गडावर शिवजयंतीनिमित्त यावर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. राज्यभरातून शिवज्योत घेऊन येणारे युवक, विविध संघटनांचे कार्यकर्ते तसेच शिवजन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आलेले नागरिक यामुळे गड परिसर रात्रीपासूनच गजबजला होता. शिवजयंती म्हटले की, शिवभक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतो. शिवनेरी गडावर शिवजयंतीनिमित्त लोकांची मोठी गर्दी जमली होती. मात्र, गर्दी वाढत होती आणि पुरेसा पोलिस बंदोबस्त नसल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. अंबरखाण्याच्या खालच्या हत्ती दरवाजा परिसरात तसेच गणेश दरवाजा या अरुंद मार्गांवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. या गर्दीला नियंत्रित करणे पोलिसांनाही शक्य होत नव्हते. त्यामध्येच गर्दी सातत्याने वाढत राहिली.
शिवनेरी गडावर चेंगराचेंगरी लहान मुलांसह महिला जखमी
अंबरखाण्याच्या खालच्या हत्ती दरवाजा परिसरात तसेच गणेश दरवाजा या अरुंद मार्गांवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. रस्ते अरुंद असल्याने आणि एकाच वेळी मोठ्या संख्येने भाविक पुढे सरकल्याने चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. या घटनेत काही महिला व लहान मुलांसह अनेक नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू
जखमींना तातडीने जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. शिवजयंतीसारख्या मोठ्या उत्सवावेळी दरवर्षी मोठी गर्दी होत असल्याने भविष्यात योग्य गर्दी नियंत्रण, प्रवेश-निर्गमन मार्गांचे नियोजन आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त हा अगोदरच्या दिवसांपासूनच गडावर ठेवणे गरजेचे आहे.
पुरेस पोलिस बंदोबस्त नसल्याचा आरोप करण्यात आला
ज्यावेळी गर्दी वाढत होती, त्यावेळी गर्दी नियंत्रणात करण्याचा प्रयत्न उपस्थित पोलिसांनी केला. पण गर्दी अधिक असल्याने चेंगराचेंगरी झाली. या गर्दीत लहाने मुले आणि महिला देखील होत्या. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर जखमींना प्रशासनाकडून रूग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळपासूनच शिवजयंतीनिमित्त लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत.





