राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्री व निर्मितीविरोधात सोलापूर जिल्ह्यात एकूण ८ गुन्हे नोंदविले असून पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल विभागाने जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क सोलापूरचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक आदित्य पवार, निरीक्षक मस्करे, दुय्यम निरीक्षक पाटील, झगडे, भांगे यांच्यासह जवान कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. २६ जानेवारी) रोजी मुळेगाव तांडा, बक्षीहिप्परगा तांडा, वडजी तांडा, सीताराम तांडा व सेवालाल तांडा या हातभट्टी ठिकाणांवर कारवाई केली.
यानंतर त्यांना सदर ठिकाणी गुळ मिश्रित रसायनापासून हातभट्टी दारू (अवैध मद्य) तयार होत असल्याचे आढळून आले. पथकाने सदर कारवाईत ६२०० लीटर रसायनाची विल्हेवाट लावली. ८१० लीटर अवैध मद्य व एक मोटरसायकल असा २ लाख १६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. अवैध मद्य निर्मिती व विक्री करणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.