शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने नितेश राणे यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. पण न्यायालयीन कोठडीमध्ये जाण्यापूर्वीच नितेश राणे यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे नितेश राणे यांचा मुक्काम कोठडीऐवजी रुग्णालयात असणार आहे.
संतोष परब हल्ल्या प्रकरणी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर नितेश राणे यांना शुक्रवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी 8 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. त्यासाठी सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. तर नितेश राणे यांच्या बाजूने वकील सतिश मानेशिंदे आणि वकील संग्राम देसाई (Adv. Sangram Desai) यांनी युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून लावली आणि नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.