कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद करण्यात आली होती. त्यानंतर ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर काही अटींवर पुन्हा शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली होती. मात्र आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शाळा व महाविद्यालये पुर्णवेळ सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
या पार्श्वभुमीवर सोमवारपासून पुणे येथील सर्व शाळा पुर्णवेळ सुरू राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच ज्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून २५ टक्के उपस्थितीत शालेय स्पर्धांसाठी स्थानिक अधिकाऱ्यांकडून परवानगी दिली जाणार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.