चमकदार दात कोणत्याही व्यक्तीच्या सौंदर्यात भर घालतात. परंतु अनेक वेळा दातांची योग्य निगा राखली नाही की तेच दात आपल्यात कमीपणाची भावनाही निर्माण करीत असतात. पिवळे दात हे आजकाल सर्वांच्याच चिंतेचा विषय आहे.
रोज ब्रश करावा
अनेकदा असे दिसून येते, की ब्रश करण्याचा अनेकांना अतिशय कंटाळा असतो. ब्रश करतानाही तो योग्य पध्दतीने केला जात नाही. केवळ वरच्यावर दातांना ब्रश केला जात असतो. त्यामुळे दातांची योग्य सफाई होत नाही. परिणामी दात पिवळे होण्याची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे योग्य पध्दतीने ब्रश करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात असतो. तसेच दिवसातून किमान दोन वेळा ब्रश करणे आपल्या दातांच्या आरोग्यासाठी चांगले असते.
बेकिंग सोडा
दातांना चमकदार करण्यासाठी बेकिंग सोडा अतिशय उत्तम पर्याय आहे. टूथपेस्टवर चिमुटभर बेकिंग सोडा टाकून चांगल्या पध्दतीने ब्रश करावा, त्यानंतर गुळण्या करुन दात स्वच्छ करावेत, असे आठवड्यातून दोन वेळा केल्यास पिवळ्या दातांची समस्या मुळापासून नष्ट होउन जाईल.
ॲप्पल साइडर विनेगर
दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी ॲप्पल साइडर विनेगर एक प्रभावी माध्यम आहे. दोन चमचे ॲप्पल साइडर विनेगर दीडशे Ml पाण्यात टाकून ते एक ते दोन मिनिटे तोंडात फिरवा, त्यानंतर गुळणी बाहेर टाकून ब्रश करावा, असे केल्याने पिवळे दात चमकदार होतात.
संत्र्याची साल
दातांवरील पिवळेपणा काढण्यासाठी संत्र्याची साल अत्यंत प्रभावी समजली जात असते. संत्र्याची साल आपल्या दातांवर किमान दोन मिनिटे रगडावी, यात एक काळजी घेणे गरजेचे आहे, साल हलक्या हातांनी रगडावी नाहीतर आपल्या हिरड्यांना त्याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.