महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. यंदा परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. विद्यार्थी देखील झपाटून अभ्यास करत आहेत. अशातच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयात परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता आहे.
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत संकेत दिले आहेत. शिक्षकांसोबत आयोजित केलेल्या बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी म्हणाल्या, ऑफलाईन परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजूनही काही शंका आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करावे. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार गोंधळ उडणार नाही, याबाबत काळजी घ्या.
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास झाले. काही ठिकाणी ऑफलाईन वर्ग देखील सुरू करण्यात आले होते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेबाबत भीती निर्माण झाली आहे. वार्षिक परीक्षेला सामोरे जाताना निर्माण होणारा ताण-तणावासाठी मार्गदर्शन आणि समुदेशन करण्यासाठी @scertmaha तर्फे प्रशिक्षित मार्गदर्शक आणि समुपदेशकांची सल्ला, मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्गदर्शक आणि समुपदेशकांची यादी https://maa.ac.in/index.php?tcf=counselors_list या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देखील शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत.
दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने ऑनलाईन पद्धतीने (Online Hall ticket) हॉल तिकीट उपलब्ध करून दिले आहेत. बोर्डाची अधिकृत वेबसाईट www.mahahssboard.in वरून विद्यार्थ्यांना हॉल टिकीट डाऊनलोड करता येईल. तसेच शाळा आणि महाविद्यालयातून ऑनलाईन हॉल तिकीटची प्रिंट मिळणार आहे.
त्याचबरोबर कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. तसेच दोन वर्षांनी परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत आहे. त्यामुळे तसेच त्यांचा अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी यंदा बोर्डाने नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडून (SCERT) ही प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. ‘एससीईआरटी’च्या वेबसाइटवर ती मोफत उपलब्ध केली जाणार आहे. http://www.maa.ac.in या संकेतस्थळावर विषयाप्रमाणे प्रश्नावली अपलोड करण्यात आली आहे.