अलीकडे अलीकडे तरुणांमध्ये अल्पवयीन मुलांमध्ये ही आत्महत्या करण्याचे प्रमाण धक्कादायकरित्या वाढलं आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. अशीच एक धक्कादायक घटना रत्नागिरी जिल्ह्यात लांजा येथे घडली आहे.
एका युवतीने बारावीच्या परिक्षेत दोन विषयांत नापास झाली म्हणून आत्महत्या केली आहे. यामुळे युवतीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लांजा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने व दोन विषयांत नापास झाल्यामुळे या मुलीने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नैराश्यातून हे पाऊल उचलले गेले आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. युवतीने आपल्या घरातच किटकनाशक प्राशनकरून आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे.
मुलीने किटकनाशक घेतलं आहे हे लक्षात येताच, तिच्या घरच्यांनी तातडीने तिला लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे, पुढील उपचारासाठी तिला रत्नागिरी आणि त्यानंतर कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पालकांच्या प्रयत्नांना काही यश मिळाले नाही आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
कॉमर्सच्या विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल
लांजा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युवती इयत्ता बारावीत शिकत होती. परिक्षेचा निकाल लागला तेव्हा ती नापास झाल्याचे समजले. दोन विषयात तिला कमी गुण मिळाल्यामुळे ती नापास झाली होती. अकाऊंट्स आणि इंग्रजी या विषयांमध्ये तिला कमी गुण मिळाले होते. या गोष्टीमुळे ती अक्षरश: खचून गेली होती. ही बाब तिने फार मनाला लावून घेतली होती. याच तनावाखाली एके दिवशी तिने घरात असलेले फवारणीचे औषध प्राशन केले. घरातल्यांनी तिला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. परंतू, उपचारादरम्यान तिचा करूण अंत झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तरूणीच्या कुटुंबावरही दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अमृ. क्र. ६४/२०२५,194 भारतीय प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.









