एका महिलेचा तिच्याच घरात गळा दाबून खून केल्यानंतर तिचा मृतदेह घरातील बेडमध्ये टाकून आरोपी फरार झाला आहे. ही धक्कादायक घटना डोंबिवली येथील दावडी गावातील ओम रेसिडेन्सी येथे घडली. यासंदर्भात या महिलेच्या पतीने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, सुप्रिया शिंदे (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे. पती किशोर हे कामाले गेले होते. सुप्रिया हिने इमारतीतील मैत्रिणीला मला बर वाटत नसून, तू माझा मुलगा श्लोक याला शाळेत सोडशील का असे विचारले. त्यानुसार मैत्रीण स्वाती हिने मुलाला शाळेत सोडले. मात्र दुपारी १२.३० वाजून गेले तरी ती मुलाला आणायला शाळेत न गेल्यामुळे मुलाच्या शिक्षकांनी अजून श्लोकची आई त्याला घ्यायला आली नसल्याचे स्वाती यांना सांगितले.
त्यानंतर स्वाती जाधव यांनी सुप्रिया यांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी उचलला नाही. स्वाती यांनीच सुप्रिया यांचे पती किशोर याना फोन करून सुप्रिया फोन उचलत नसल्याचे सांगितले. तसेच श्लोक याला शाळेतून परत घरी आणले. मात्र घरात कोणी दार उघडत नसल्याने बऱ्याच वेळ शेजाऱ्यांकडे श्लोकला ठेवले. त्यानंतर शेजाऱ्यांकडे ठेवलेली चावी घेऊन स्वाती यांनी दार उघडले. मात्र संपूर्ण घरात सुप्रिया नसल्याचे स्वाती यांच्या लक्षात आले. तिने सुप्रियाचा पती किशोर यांना फोनवरून याची माहिती दिली.
संध्याकाळी किशोर घरी आल्यानंतर सुप्रियाला शोधाशोध करण्यास सुरुवात झाली. मात्र कुठेच पत्ता लागत नसल्याने शेवटी पोलीस ठण्यात तक्रार करायची असे ठरवून किशोर पोलीस ठाण्यात गेले. मात्र घरात जमलेल्या नातेवाईकांच्या सुप्रिया मृत अवस्थेत सोफा बेडमध्ये असल्याचे दिसून आले. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसात तक्रार करण्यासाठी गेलेल्या किशोरला फोन करून सांगितल्यानंतर पोलीस आणि पती किशोर घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा अधिक तपास मानपाडा पोलीस करत आहेत.