75 वर्षीय महिलेचा विनयभंग महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना वॉर्डबॉयने तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. वृद्धेचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी वॉर्डबॉयला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. कानादास वैष्णव असे या वॉर्डबॉयचे नाव आहे. डोंबिवलीतील स्पर्श हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली आहे.
डोंबिवली पूर्वेतील नामांकित स्पर्श हॉस्पिटलमध्ये एक महिला उपचारासाठी दाखल झाली होती. उपचारादरम्यान या 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेसोबत गैरवर्तन करण्यात आले. 16 ते 19 फेब्रुवारी या दरम्यान या महिलेचा दोनदा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप आहे.
विनयभंग करणारा दुसरा कोणी नसून हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय होता. ही वयोवृद्ध महिला एक्स-रे करण्यासाठी रूममध्ये गेली असता तेथील वॉर्डबॉयने महिलेसोबत हा प्रकार केला. एकदा हा प्रकार घडल्याने महिला वाटले की चुकून हा प्रकार झाला असेल मात्र या नराधम वॉर्डबॉयने दुसऱ्यांदा असाच प्रकार केला.
पीडित महिलेने ही बाब तिच्या मुलीला सांगितली. उपचारानंतर पीडित महिलेच्या मुलीच्या तक्रारीवरुन रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी केशव हसगूले यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
आपल्या आजीसारख्या असलेल्या एका महिलेसोबत असा घृणास्पद प्रकार करणाऱ्या कानादास वैष्णवला रामनगर पोलिसांनी अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.