अलीकडच्या काळात फसवणुकीच्या चर्चा सगळीकडेच पसरत आहेत. महिलांनी केलेल्या बचत गटांमध्ये त्यांची फसवणूक झाल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे.
शाहूवाडी तालुक्यातील बचत गटाच्या महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे सादर केला आहे. अहवालामध्ये दोन कर्मचार्यांवर ठपका ठेवण्यात आला असून, त्यांना त्यांचे मत मांडण्यास संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
शाहूवाडी तालुक्यातील महिला बचत गटातील महिलांची ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील रत्नदीप भालकर व मंडले यांनी आर्थिक फसवणूक केल्याबद्दल शाहूवाडी तालुक्यातील महिलांनी गटविकास अधिकार्यांकडे तक्रार केली होती. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे केली होती. त्याची दखल घेऊन सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी तीन अधिकार्यांची चौकशी समिती नेमली. या समितीचे प्रमुख ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील सहा. प्रकल्प अधिकारी ज्ञानदेव मडके आहेत.
या समितीला दहा दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. हा अहवाल सादर न करण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ झाला होता. हा अहवाल आज सीईओ चव्हाण यांच्याकडे सादर करण्यात आला. या अहवालमध्ये भालकर व मंडले यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. त्यांनाही मत मांडण्यासाठी दोन दिवसांची संधी देण्यात आली आहे. त्यांचे मत ऐकून घेतल्यानंतर संबंधितांवर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, असे सीईओ चव्हाण यांनी सांगितले.
मी सर्व मॅनेज केले आहे !
ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील कारभारी आणि जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील जेवणाचा ठेका महिला बचत गटाच्या नावावर आपल्या भावाला मिळवून देण्यात यशस्वी झालेला ‘लोणारी’ हा शाहूवाडीचे सर्व प्रकरण मॅनेज केले आहे. त्यामध्ये काही होणार नाही, असे जवळच्या लोकांना सांगत होता, अशी चर्चा विभागात होती.