बँकेतून काढलेले पैसे बरोबर आहेत की नाही, हे तपासण्यासाठी पैसे मोजत बसलेल्या व्यक्तीला तब्बल 31 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. वाळूज परिसरातील बजाज नगरातील आयडीबीआय बँकेत ही घटना घडली. सोमवारी दुपारी शैलेश सुभाष सोनवणे हे बँकेत गेले असता बँकेतून काढलेले पैसे मोजत होते. तेव्हा एक इसम तेथे येऊन, यातल्या नोटा खराब आहेत, अशी बतावणी करू लागला. त्यानंतर बोलण्यातून त्याने 31 हजार रुपयांची रोकड लांबवल्याचं उघड झालं. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
शैलेष सुभाष सोनवणे हे जोगेश्वरी शिवारातील महेश इंटरप्रायजेस कंपनीक अकाउंटंट आहेत. शैलेश सोनवणे बजाज नगरातील आयडीबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास बँकेतून 1 लाख 10 हजार रुपये काढून तेथील बाकड्यावर पैसे मोजत बसले होते. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना रोखले. बंडलमधील नोटा खराब असल्याचे सांगत पैशाचे बंडल हातात घेतले. भामट्याने खराब नोटा बाजूला काढण्याची बतावणी करीत हातचलाखीने 31 हजार रुपये अलगद काढून घेतले. यादरम्यान बँकेतून पैसे काढण्यासाठी स्लीप भरुन देण्याची विनंती करीत एकाने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. तेवढ्यात नोटा काढून घेणारा भामटा गायब झाला. काही वेळानंतर सोनवणे यांनी बंडल मोजले असता त्यांना 500 रुपयांच्या 62 नोटी गायब झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, बँकेच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता सोनवणे यांच्या हातातील नोटांचे बंडल घेणारी व्यक्ती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही व्यक्ती साधारण 35 ते 40 वर्ष वयोगटातील असावी, असा अंदाज आहे. तसेच स्लीप भरण्याचा बहाणा करणारा आणखी एकजणही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.