ताजी बातमी ऑनलाईन टीम
आयसीसी टी20 क्रमवारीत (ICC T20 Rankings) श्रेयस अय्यरला मोठा फायदा झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत त्याने शानदार कामगिरीच्या जोरावर 27 स्थानांची झेप घेतली आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आता T20 क्रमवारीत 18 व्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टॉप-10 रँकिंगमधून बाहेर पडला आहे. तो श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचा भाग नव्हता. त्यामुळे त्याचे नुकसान झाले आणि तो 10 व्या क्रमांकावरून 15 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. T20I मालिकेत भारताने श्रीलंकेचा 3-0 ने पराभव केला. श्रेयस अय्यरने नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 174 च्या स्ट्राईक रेटने तब्बल 204 धावा केल्या होत्या. त्याचा त्याला फायदा झाला आहे. या मालिकेपूर्वी तो 27 व्या क्रमांकावर होता. तर रोहित शर्मा 11 व्या स्थानावरन 13 व्या स्थानवर घसरला आहे.
दुसरीकडे भुवनेश्वर कुमारने गोलंदाजांमध्ये तीन स्थानांनी झेप घेतली आहे. ते आता 17 व्या क्रमांकावर आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत अखेरच्या सामन्यात श्रीलंकेच्या पाथुम निसांकाने 75 धावा केल्या होत्या. यामुळे तो सहा स्थानांनी वर येऊन नवव्या क्रमांकावर आला. संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) मोहम्मद वसीम हा देखील T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रमवारीत वरच्या स्थानावर पोहोचलेल्या खेळाडूंमध्ये होता. आयसीसी पुरुष T20 विश्वचषक पात्रता A च्या अंतिम सामन्यात आयर्लंडविरुद्धच्या नाबाद शतकाने त्याला 12 व्या स्थानावर पोहोचण्यास मदत केली. यूएईच्या कोणत्याही फलंदाजाची ही सर्वोत्तम क्रमवारी आहे, त्याच्या आधी शैमान अन्वर 2017 मध्ये 13 व्या स्थानावर होता.
श्रीलंकेच्या लाहिरू कुमाराने पहिल्यांदाच टॉप 40 गोलंदाजांमध्ये प्रवेश केला आहे. यूएईचा गोलंदाज झाहरू खान 17 स्थानांनी झेप घेत 42व्या तर आयर्लंडचा जोश लिटल 27 स्थानांनी झेप घेत 49 व्या स्थानावर आहे. रोहन मुस्तफा अष्टपैलू रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचला आहे आणि फेब्रुवारी 2020 मध्ये त्याच्या पाचव्या क्रमांकाच्या सर्वोत्तम रँकिंगपेक्षा फक्त एक स्थान खाली आहे.




